पॅरासिटामोल, एजिथ्रोमायसिन होतेय महाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात एकीकडे कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे, तर आता औषधांवरही याचा प्रभाव दिसून येऊ लागला आहे. कोरोना काळात वापरल्या जाणाऱया औषधांच्या विक्रीत 300 टक्क्यांपर्यंतची वृद्धी आढळून येत आहे. पण सध्या याच्या किमती नियंत्रणात असल्याने ग्राहकांना अधिक भुर्दंड बसत नाही.
पॅरासिटामोल सारख्या आवश्यक औषधांची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. यादरम्यान औषध उत्पादक कंपन्या निर्मितीत वापरला जाणारा कच्चा माल प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. औषध कंपन्यांनी स्वतःच्या नफ्याचे मार्जिन कमी केले असल्याने औषधांच्या किमतीत फारसा बदल दिसून येत नाही हे सत्य आहे. पॅरासिटामोल, आयवरमेक्टिन, डॉक्सीसायक्लिन, एजिथ्रोमायसिन, मेरोपेनेम यासारख्या आवश्यक औषधांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱया कच्च्या मालाच्या मागणीत 300 टक्क्यांपर्यंतची वृद्धी झाली आहे.
आयवरमेक्टिन निर्मितीसाठी फेब्रुवारीत जी सामग्री 17 हजार रुपयांमध्ये एक किलो मिळत होती, त्याचकरता आता 58 हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशाप्रकारे फेब्रुवारीच्या तुलनेत एजिथ्रोमायजिनसाठी वापरल्या जाणाऱया सामग्रीच्या दरात 3500 रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. डॉक्सीसायक्लिनसाठीच्या सामग्रीची किंमत दुप्पट झाली आहे. यामुळे औषध निर्मात्यांना प्रति किलोग्रॅम 6000 रुपये अधिक द्यावे लागणे भाग पडले आहे.
या सर्व औषधांच्या किमती सध्या नियंत्रणात असून याचा वापर करणाऱयांना किमतीत कुठलाच मोठा बदल दिसून येत नाही. पण अशाचप्रकारे कच्च्या मालाचा खर्च वाढत राहिल्यास उत्पादकांना औषधांचा तुटवडा भरून काढून अशक्य ठरणार असल्याचे एका औषध कंपनीच्या प्रमुखाने म्हटले आहे.