प्रतिनिधी / पणजी :
कोरोनाने राज्यात कहर केला असून गुरुवारी आतापर्यंतचे उच्चांकी 570 बाधित सापडले. कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 271 राहिली. परिणामी, आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 10494 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 3491 एवढे सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात आणखी दोन रुग्ण दगावल्याने आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 91 वर पोहोचली आहे. अध्याप मडगाव येथील कोविड 19 इस्पितळात सुमारे 18 जणांची अवस्था गंभीर आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी उच्चांक गाठला. आतापर्यंतची सर्वाधिक संख्या म्हणून त्याकडे पहावे लागेल. दिवसाकाठी बाधितांचा आकडा कधी दुप्पट तर कधी चौपटीने वाढत असल्याने राज्यातील कोराना फैलावाची परिस्थिती हाताबाहेर पोहोचल्याचे दिसून येते. गुरुवारी तब्बल 570 जण कोरोनाबाधित झालेले सापडले. दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढतच आहे.
मोठय़ा प्रमाणात स्वॅब नमुन्यांची चाचणी
सध्या मोठय़ा प्रमाणात स्वॅब नमुने तपासणीसाठी येत आहेत. गुरुवारी 3236 नमुने तपासणीसाठी आले असता 1926 नकारात्मक तर 570 जणांचा अहवाल सकारात्मक आला. 740 जणांचा अहवाल अद्याप हाती येणे शिल्लक आहे. विलगीकरणासाठी 105 जणांना पाठविण्यात आलेले आहे.
चोवीस तासात दोन रुग्णांनी गमावले प्राण
गेल्या 24 तासात दोन रुग्णांनी आपले प्राण गमावले. राजबाग काणकोण येथील 48 वर्षीय एका व्यक्तीचे आणि आके मडगाव येथील 73 वर्षीय एका ज्येष्ठ नागरिकाचे मडगावच्या कोविड इस्पितळात निधन झाले. या दोन जणांच्या मरणानंतर आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 91 झाली आहे.
आतापर्यंतचे उच्चांकी कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात 29 जानेवारी 2020 पासून कोरोनाबाबत चाचणी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत उच्चांकी आकडा हा गुरुवारी झाला. 570 रुग्ण एका दिवसात सापडलेले आहेत. यावरून राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिघाडलेली आहे व आता हा आकडा वाढत जाऊन तो एक हजारपर्यंत जाण्याची भीती आहे.
पेडणे, मडगावात रुग्णसंख्येत प्रचंड वाढ
दरम्यान, राज्य सरकारने सायंकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये पेडणे तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आढळून आली. बुधवारी बाधितांची संख्या 79 होती, गुरुवारी त्यात 63 नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 142 झाली आहे.
मडगावात एकाच दिवशी 81 नवे रुग्ण सापडल्याने मडगाव व आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. मडगावात रुग्णांची संख्या 390 झाली आहे.