डब्ल्यूएचओची घोषणा- लस याविरोधातही प्रभावी
वृत्तसंस्था / जिनिव्हा
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाच्या दुसऱया लाटेत भारतात फैलावत असलेल्या स्ट्रेनला जागतिक स्तरावर चिंताजनक (वॅरियंट ऑफ कंसर्न) ठरविले आहे. भारतात सर्वप्रथम ऑक्टोबरमध्ये आढळलेला हा वॅरियंट बी-1617 अधिक संक्रामक वाटत आहे आणि तो सहजपणे फैलावू शकत असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
एका मर्यादित अध्ययनात या वॅरियंटवर अँटीबॉडीजचा कमी प्रभाव हात असल्याचे आढळून आले आहे. पण याचा अर्थ या वॅरियंटमध्ये लसीबद्दल अधिक प्रतिरोधक क्षमता आहे असा होत नाही असे उद्गार कोरोनाविषयक डब्ल्यूएचओच्या प्रमुख मारिया वॅन केरखोव्ह यांनी काढले आहेत.
उपलब्ध डाटातून कोरोनावरील सर्व लसी संसर्ग रोखणे आणि बी-1617 वॅरियंटमुळे संक्रमित लोकांचा जीव वाचविण्यास प्रभावी असल्याचे आढळून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लस अन् उपचार उपयुक्त
सध्याच्या वॅरियंटच्या विरोधात लस आणि उपचार उपयुक्त आहेत. पूर्वीप्रमाणेच उपचार केले जात आहेत. याचमुळे लोकांनी पुढे येत लस घ्यावी असे डब्ल्यूएचओच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेनंतर भारतात फैलावणाऱया कोरोना वॅरियंटला डब्ल्यूएचओने कंसर्न शेणीत सामील केले आहे. आगामी काळात जगभरात वॅरियंट ऑफ कंसर्न दिसून येणार आहे. याचमुळे आम्हाला संक्रमण रोखण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा लागणार असल्याचे केरखोव्ह यांनी म्हटले आहे.
आकडेवारीवर प्रश्नचिन्ह
भारतात संक्रमणाचा दर आणि मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. इन्स्टीटय़ूट फॉर मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनने ऑगस्टपर्यंत 10 लाख मृत्यू होण्याचा अनुमान सध्याचे मॉडेल आणि आकडेवारीच्या आधारावर केले आहे, पण हेच घडेल असे नाही असे उद्गार स्वामिनाथन यांनी काढले आहेत. जगातील सर्व देशांनी कोरोनाबाधित आणि त्यामुळे होणाऱया मृत्यूंची आकडेवारी कमी दर्शविली आहे. सरकारांनी खरी आकडेवारी मांडण्याचे प्रयत्न वाढवावेत असे त्यांनी म्हटले आहे.