ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर हुकूमशहा किम जोंग उन यांनी संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.
सात महिन्यानंतर रविवारी उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती तीन वर्षांपूर्वी उत्तर कोरिया सोडून पळून गेली होती. 19 जुलै रोजी या फरार व्यक्तीने बेकायदेशीर रित्या सीमा पार करून पुन्हा उत्तर कोरियात प्रवेश केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच किम जोंग उन यांनी पॉलिट ब्यूरोची आपत्कालीन बैठक बोलावून आणीबाणी जाहीर केली.
देशात कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्यानंतर किम जोंग यांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यावर यावर्षी जानेवारीत उत्तर कोरियाने देशाच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. कोरोनाच्या भीतीने उत्तर कोरियाने चीन सोबतचा व्यापार पूर्णपणे थांबविला आहे. तसेच प्योंगयांगमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी एक महिन्यासाठी अलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.