ऑनलाईन टीम / अमरावती :
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रात्रीपासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. परंतु हा टप्पा पूर्ण होण्याच्या आधीच लॉकडाऊनचा कालावधी आणखी सात दिवसांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आता 8 मार्च पर्यंत लॉकडाऊन सुरू असणार आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप काही थांबला नाही. लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल 4061 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता अमरावती शहर, अचलपूर शहर आणि अंजनगाव सूर्जी शहरातही 8 मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यानंतरही लॉकडाऊन वाढवून घ्यायचा नसेल तर त्रिसूत्रीचा वापर करा आणि लॉकडाऊन टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या काळात आधीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तू, औषधांची दुकाने सुरु राहतील.