ऑनलाईन टीम / पॅरिस :
जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. याच दरम्यान फ्रान्समध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्रपती एमानुएल मैक्रों यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
ते म्हणाले, कोरोना व्हायरस ची दुसरी लाट भयंकर असू शकते. जर वेळीच कडक नियम नाही केले तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाख होण्याची शक्यता आहे.
पुढे ते म्हणाले, हे लॉकडाऊन शुक्रवारपासून लागू केले जाईल आणि ते 1 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. लॉकडाऊनमध्ये फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. कारखाने, शेती आणि बांधकाम यांचे काम चालू ठेवता येईल. याशिवाय नर्सिंग होमसुद्धा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत फ्रान्सचा 5 वा क्रमांक आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार. मंगळवारी कोरोनामुळे फ्रान्समध्ये 530 लोकांचा मृत्यू झाला. तर 33 हजार 417 रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखांहून अधिक आहे. तर आतापर्यंत 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.