ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये कोरोनाच्या आणखी एक व्हेरिएंट आढळून आला आहे. या व्हेरिएंटने आतापर्यंत 46 वेळा रुप बदलल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येते. आयएचयू असे या व्हेरिएंटचे नामकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन या तिप्पट संक्रमणकारक व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली असतानाच फ्रान्समध्ये आयएचयू हा व्हेरिएंट आढळला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतलेल्या 12 लोकांमध्ये या व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. हा व्हेरिएंट किती घातक आहे, हे सध्या सांगता येणार नाही. मात्र, हा व्हेरिएंट लसविरोधी आणि अधिक संक्रमणकारक असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
आयएचयूचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिअंट E484K म्युटेशनपासून बनला आहे. या व्हेरिअंटने 46 वेळा रुप बदलले आहे. त्यामुळे हा व्हेरिअंट अधिक लस विरोधी ताकदीचा असू शकतो. मेडिटेरेनी इन्फेक्शन फाऊंडेशनने 10 डिसेंबरला या व्हेरिएंटचा शोध लावला होता. हा व्हेरिएंट सध्या तरी वेगाने पसरत असल्याचे दिसून येत नाही. मात्र, इतर देशात याचा प्रसार झाला आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे.