प्रतिनिधी/ पणजी, मडगाव
राज्यात कोरोना फैलावाची स्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनत चालली असून शनिवारी एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी नोंद झाली. आतापर्यंतचे सर्व आकडे मोडीत काढून काल एकाच दिवशी 108 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. राज्यात सध्या जनतेमध्ये भयंकर अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारची हतबलता आणि विरोधकांची भूमिका यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 853 झाली आहे.
मागील तीन दिवस कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. गुरुवारी 95 रुग्ण सापडले. शुक्रवारी 94 रुग्ण सापडले तर शनिवारी रुग्णांचे शतक पूर्ण करीत 108 चा टप्पा गाठला. विधानसभा संकुल पर्वरी येथे सेवेत असलेला एक पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे, तर दक्षता खात्याचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. पोलीस स्थानके, शासकीय कार्यालयेही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्याचबरोबर वास्को येथील 45 वर्षीय मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरानाचा सहावा बळी गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आकडा वाढतो, पण भिवपाची गरज ना !
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा राज्यात वाढत चालला आहे. कोरोनाने आतापर्यंत सहा बळी घेतले आहेत. सत्ताधारी गटाचे आमदार, मंत्री गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करत आहेत. त्याचबरोबर सरकारच्या भूमिकेवर पक्षाचे आमदार टीका करीत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री ‘लोकांनी भिवपाची गरज ना’ असे सांगत आहेत, पण तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याने व फैलाव वाढत चालल्याने लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
ऑगस्टमध्ये स्थिती काय असेल ?
कोरोना वाढत चालला आहे. मागील तीन दिवस भयानक पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत आहे. आजची स्थिती पाहिल्यास जुलै अखेर व ऑगस्टमध्ये काय स्थिती असेल असे प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. दुसऱया बाजूने आता मृताची संख्या वाढू लागली आहे. पाऊस जोरदार सुरू आहे. वातावरणात गारवा वाढल्यास कोरोनाचा फैलाव काही पटींनी वाढू शकतो, अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. वृत्तपत्र कार्यालयामध्येही लोकांचे फोन येत आहेत. रोजचा आकडा विचारला जात आहे. भवितव्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा सहावा बळी
खारीवाडा वास्को येथील 45 वर्षांच्या इसमाचे निधन झाले. हा इसमही कोरोनाबाधित होता व त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य सचिवांनी याबाबत स्पष्ट केले आहे. खुप मोठी लक्षणे या रुग्णामध्ये दिसून येत नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
विधानसभा संकुलात सेवा देणारा पोलीस कोरोनाबाधित
विधानसभा संकुलात सेवा बजावणारा आयआरबी कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. विधानसभा संकुलातील जे अन्य कर्मचारी कॉन्स्टेबलच्या संपर्कात आले होते त्यांची चाचणी केली जाणार आहे.
शनिवारी 53 रुग्ण कोरोनामुक्त
शनिवारी तब्बल 108 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण कोरोना क्रियाशील रुग्णांचा आकडा 853 वर पोहोचला, तर काल 53 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कुडतरी येथील एका 74 वर्षीय महिलेला तर खरीवाडा वास्को येथील 45 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
हॉटस्पॉट वास्कोतील मांगोरहिलमध्ये रुग्णसंख्या 241 झाली आहे, तर मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा 270 वर पोचला आहे. सडा वास्को येथे 67 रुग्ण झाले आहेत. बायणा येथे 72, न्युवाडे 57, झुवारीनगर 97 तर खारीवाडा वास्को येथे 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. कुडतरी येथे 31 रुग्ण, चिंबल 29, मोर्ले सत्तरी 22 तर बाळ्ळी येथे 21 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
खारीवाडा-वास्को येथील दुसरा बळी
खारीवाडा-वास्को येथे ट्रॉलर काम करणाऱया एका 45 वर्षीय मच्छीमाऱयाला शुक्रवारी राहत्या खोलीतच मृत्यू आला. गुरुवार दि. 2 रोजी त्याने स्वॅब चाचणी घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोविडमुळे मृत्यू आलेल्याची संख्या सहावर पोचली आहे. शुक्रवारी कोविड हॉस्पिटलमध्ये एका 75 वर्षीय महिलेचा कोविडमुळे बळी गेला होता. ही महिला कुडतरी येथील असून काल शनिवारी कुडतरी येथील सेंट आलेक्स चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी एकाच दिवशी दोघांचा कोविडमुळे बळी गेला. यातील एक कोविड हॉस्पिटलमध्ये तर दुसरा राहत्या खोलीत. खारीवाडो येथील मच्छीमाऱयाला गेल्या दहा दिवसांपासून ताप येत होता. मात्र, त्याचे त्वरित निदान झाले नाही. मृत्यू येण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी त्याने स्वॅब चाचणी घेतली होती व त्याचा अहवाल शुक्रवारी आला व याच दिवशी त्याला मृत्यू देखील आला. राहत्या खोलीत मृत्यू आल्याने, वास्को पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कोविड हॉस्पिटलच्या शवागरात पाठवून दिला.
गोव्यातील पहिले शवपरीक्षण
राहत्या खोलीत मृत्यू आल्याने पोलीस तक्रार झाली. त्यामुळे शवपरीक्षण करावे लागले. मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळाचे शवचिकित्सक डॉ. मधु घोडकीरेकर यांनी शवपरीक्षण केले. कोविड मार्गदर्शनतत्वानुसार कोविडमुळे मृत्यू आलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करता येत नाही. त्यामुळे शवपरीक्षण करण्यात आले. गोव्यात शवपरीक्षण करण्यात आलेली ही पहिली घटना आहे.
खारीवाडय़ातील दुसरी घटना
या पूर्वी खारीवाडय़ावरील एका व्यक्तीचा कोविडमुळे बळी गेला होता. त्यात शुक्रवारी ट्रॉलरवर काम करणाऱया कामगाराचा कोविडमुळे बळी गेल्याने खारीवाडय़ावरील संख्या दोनवर पोचली. हा कामगार कर्नाटकातील असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहिती प्रमाणे हा कामगार मांगोरहिल भागात रहात होता. मात्र, या भागात कोरोनाच्या केसीस वाढल्याने सरकारने हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याने तो खारीवाडा येथे खोलीत एकटाच रहात होता तर त्याची फॅमिली मांगोरहिल भागात राहत असल्याची माहिती मिळाली.
खारीवाडा येथे हा कामगार एकाटच रहात असल्याने त्याच्या आरोग्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. दहा दिवस ताप येत असल्याने शेवटी त्याने स्वॅब चाचणी केली. त्यावेळी त्याला मोबाईलवर संदेश येईल अशी कल्पना देण्यात आली. जेव्हा तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा पोलीस त्याच्या खोलीकडे गेले. त्यावेळी त्याची खोली आतून बंद केल्याचे आढळून आले. पोलिसांनी खोली उघडली असता तो मृत झाल्याचे आढळून आले. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याचा मृतदेह कोविड हॉस्पिटलच्या शवागरात आणला गेला.