सिंधुदुर्ग प्रशासनाने अहवाल मागविणे आवश्यक : तपासणी नाक्यावरील कर्मचाऱयांची तपासणी करा!
मयुर चराटकर / बांदा:
‘कोरोना’मुक्त गोव्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर गोव्यात आढळलेले कोरोनाचे रुग्ण सिंधुदुर्गमार्गे गोव्यात गेल्याचे उघड झाले आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या बांदा तपासणी नाक्यावरून या कोरोनाबाधित रुणांनी प्रवास केला होता, हे स्पष्ट झाल्याने आता सिंधुदुर्ग प्रशासनाने गांभीर्याने विचार करून 12 मे रोजी गोव्यात गेलेल्या त्या प्रवासी वाहन व ट्रकची माहिती घेऊन ते वाहन नेमके कोठे-कोठे थांबले होते, याचा तपास करून ते ज्यांच्या-ज्यांच्या संपर्कात आले त्यांना क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. जिह्यात त्यांनी नेमका कोणत्या तपासणी नाक्यावरून प्रवेश केला, याचा तपास करणे गरजेचे आहे.
तीन एप्रिलपासून गोव्यात कोरेनाबाधित एकही रुग्ण सापडला नसल्याने सुमारे 40 हून अधिक दिवस गोवा कोरोनामुक्त राज्य राहिले. तेथील प्रशासनाने गोवा कोरेनामुक्त असल्याचे सांगत गोव्यात प्रवेश देत असताना प्रत्येकाची कडक तपासणी हाती घेतली. 12 मे रोजी सोलापूरहून दाखल झालेले कुटुंब व मुंबईहून दाखल झालेल्या खलाशाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने कोरोनामुक्त गोव्यात सुमारे 40 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोन दिवसात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर आता रुग्ण वाढतच आहेत.
काही कोरोनाबाधितांचा प्रवास सिंधुदुर्गमार्गे?
गोव्यात सापडलेल्या कोरोनाबाधित सोलापूर येथील कुटुंबियांनी सिंधुदुर्गमार्गे प्रवास करत पत्रादेवीमार्गे गोवा गाठले. तर मुंबईहून प्रवास केलेल्या खलाशाने सिंधुदुर्गमार्गे प्रवास केल्याने सिंधुदुर्गातही भीतीचे वातावरण आहे. गोव्यात आढळलेल्या रुग्णांनी नेमके गोव्यात प्रवेश करतांना कोणत्या तपासणी नाक्यावरून प्रवेश केला? त्यांची रितसर नोंदणी केली आहे का? जर तपासणी केली असेल तर त्यावेळी त्या तपासणी नाक्यावर असलेल्या आरोग्य, पोलीस व अन्य कर्मचाऱयांच्या आरोग्याबाबत शासनाने योग्य पाऊल उचलले पाहिजे.
त्या रुग्णांचा अहवाल मागवा!
गोव्यात सापडलेले काही कोरोनाबाधित रुग्ण सिंधुदुर्गमार्गे गोव्यात गेल्याचे बोलले जाते. जर ते सिंधुदुर्गातून गेले असतील तर खारेपाटण, फोंडा, गगनबावडा की आंबोली तपासणी नाक्यावरून जिह्यात आले, याचा तपास करून ते विश्रांतीसाठी नेमके कोणत्या गावात थांबले होते? कोणत्या ना कोणत्या कारणाने खरेदीसाठी किंवा अन्य कारणासाठी थांबावे लागले असेल आणि जर ते थांबले असतील तर त्यांनी कोणत्या दुकानात खरेदी केली, याची माहिती घेणे गरजेचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग प्रशासनाने गोवा सरकारकडे माहिती मागविली पाहिजे. तसेच त्या-त्या भागात जनजागृती करून संबंधितांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. आधीच जिल्हय़ात मुंबईहून आलेल्यांमुळे शासनावर ताण पडत आहे. त्यातच गोव्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात जर जिह्यातील काहीजण आले असतील तर त्यांना वेळीच खबरदारी म्हणून अलग करणे गरजेचे आहे.
कर्मचारी सुरक्षिततेचे काय?
सद्यस्थितीत गोव्यात आढळलेले कोरोनाबाधित काही रुग्ण बांदा तपासणी नाक्यावरून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तशी माहिती गोवा सरकारच्यावतीने देण्यात आली. मात्र, असे असतानाही गोव्यातून येणाऱया वाहनांची तपासणी करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री सिंधुदुर्ग पोलीस, आरोग्य विभाग व अन्य विभागाला दिलेली नाही. तर सदर दोन्ही वाहने जर गोव्यात जात असताना येथील कोणा कर्मचाऱयांच्या संपर्कात आले असतील तर त्यांच्यामार्फत कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे येथील कर्मचाऱयांना पीपीई कीट देणे गरजेचे आहे.
परजिह्यातील वाहन जिह्यात थांबणे धोकादायक
प्रवासी वाहनाला गोव्यात प्रवेश देण्यासाठी किमान 5 ते 6 तासांची प्रतीक्षा करावी लागते. दरम्यानच्या काळात कुटुंबीय असल्यास असल्यास त्यांचे बांदा शहरात नाश्ता करण्यासाठी पाऊल वळते. अलिकडेच एक गुजराती कुटुंब दोन दिवस बसस्थानकात गोव्यात जाण्यासाठी ई पासच्या प्रतीक्षेत उभे होते. अशा प्रकारे कोरेनाबाधित बाजारपेठेत फिरून गेल्यास धोका उद्भभू शकतो.