काँग्रेस जिल्हा पंचायत उमेदवारांनी मांडली व्यथा
प्रतिनिधी / मडगाव
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने मोठय़ा प्रमाणात पैशांचा वापर केला व मतदारांना मतदान केंद्रावर आणले, त्यामुळेच भाजपला जिल्हा पंचायत निवडणूक जिंकणे शक्य झाले. तसेच काँग्रेसचे मतदार मतदान केंदावर आलेच नाही. त्याचा फटका काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसल्याची व्यथा काल दक्षिण गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांनी गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्या समोर मांडली.
गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी मडगावात काँग्रेस कार्यालयात दक्षिण गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांची भेट घेऊन निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेतली. यावेळी बऱयाच उमेदवारांनी पैशांच्या बाबतीत काँग्रेसचे उमेदवार कमी पडले. तसेच भाजपने पैशांचा मोठय़ा प्रमाणात वापर करताना, सरकारी यंत्रणेचा देखील वापर केला. तसेच काँग्रेसचे मतदार मतदानासाठी कोरोनामुळे बाहेर न पडल्याने, त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे स्पष्ट केले.
श्री. गुंडूराव यांनी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकात झालेल्या पराभवामुळे खचून न जाता, जोमाने कार्य करण्याचा सल्ला यावेळी उमेदवारांना दिला. त्यांनी दक्षिण गोव्यातील गट काँग्रेसचे पदाधिकारी तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱयांची बैठक घेतली व त्यांचे ही म्हणणे ऐकून घेतले. जिल्हा पंचायतीत जरी पराभव झाला तरी खचून न जाता, गट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कार्य करावे, पुन्हा एकदा मतदारांकडे जाऊन संपर्क साधावा व पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन, एम. के. शेख, आलेक्स सिक्वेरा, जोसेफ डायस, सुभाष फळदेसाई इत्यादी उपस्थितीत होते.