ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाने दुसऱ्या लाटेत अक्षरशः थैमान घातले आहे. लं आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमवावे आहेत. कोणी आपले आई-वडील गमावले, तर कोणी भावंडांना गमावले, कोणी आजी-आजोबा, तर कोणी आपली मुले गमावली. कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेक फ्रंट लाईन वर्कर्सनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करतात. त्यातच आता टाटा स्टीलने अशा लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.
कंपनी व्यवस्थापनाने एक परिपत्रक काढत माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, कोविड-19 मुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार म्हणजेच, त्याला मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार आहे.
तसेच त्या कर्मचाऱ्याला जर कंपनीकडून राहण्यासाठी घर मिळाले असेल तर त्याच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्या घरात राहता येईल, यासोबतच कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभही घेता येणार आहे.
याव्यतिरिक्त कंपनीने फ्रंट लाईन वर्कर्ससाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर आपले कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला तर कंपनी व्यवस्थापन पदवीपर्यंत त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची संपूर्ण काळजी घेणार असून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे.
टाटा स्टील व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. कोविडच्या या साथीच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे.