ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
योगामुळे मानसिक शांती, संयम आणि सहनशक्ती मिळते. तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी योगा गरजेचा आहे. कोरोना संकटात जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने घेत आहे. प्रत्येकाने अशाच प्रकारे योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. मोदी म्हणाले, लहान मुले, तरुण, कुटुंबातील वृद्ध, योगातून एकत्र आले की घरात ऊर्जा संचार होतो. त्यामुळे या वेळी योगदिन हा भावनिक योगाचा दिवस आहे, जो आपल्या कौटुंबिक बंधनाला अधिक दृढ करण्यासाठी एक दिवस आहे. कोरोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्याने घेत आहे. योगामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनते. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचा भाग बनवावे.
आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. कोरोनाच्या या संकटात जगभरातील लोकांचा ‘माय लाईफ माय योग’ या स्पर्धेतील सहभाग हे दाखवून देतो की, लोकांचा योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचे ब्रीद ‘घरातच योग, कुटुंबासोबत योग’ असे आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. कोविड-19 विषाणू आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. आपली श्वसनसंस्था बळकट करण्यासाठी योगा महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे प्रत्येकाने नियमित सरावात योगा समाविष्ट केला पाहिजे.