ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेलाही कोरोनाने वेढले असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या वाढत्या फैलावाला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत 50 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूने आतापर्यंत 41 जणांचा बळी घेतला आहे. तर 1740 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात कोरोनाने आतापर्यंत 5300 जणांचा बळी घेतला आहे तर 1 लाख 34 हजार 300 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाला जागतिक महामारी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील 15 कोटी लोक या विषाणूच्या कचाटय़ात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांच्या सहकाऱयांनी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या संकटाविरोधात लढण्यासाठी ट्रम्प यांनी 50 अब्ज डॉलर्सचा निधी दिला आहे.
चीननंतर इटलीमध्ये या विषाणूचा जोरात फैलाव होत आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा 1266 वर पोहचला आहे. तर 17660 लोक संक्रमित झाले आहेत. युरोपच्या अन्य देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत चालले आहेत. चीनच्या तुलनेत इटलीत कोरोनाची लागण आणि मृत्यू होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.डब्ल्यूएचओने शुक्रवारी युरोपला कोरोनाचे नवे केंद्र घोषित केले आहे.