31 मे राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन विशेष : दोन हजारांहून अधिक जणांचे समुपदेशन
कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
देशभर तंबाखूमुळे विविध आजार टाळण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन प्रतिवर्षी 31 मे रोजी साजरा होतो. जिल्हÎातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम शाखेने कोरोना काळातही तंबाखू विरोधात ऑनलाईन जनजागृती केली आहे. वर्षभरात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम शाखेतील तीन महिलांच्या या तीन खांबी तंबूने 2 हजारांहून अधिक जणांचे समुपदेशन केले. त्यातील 82 जण तंबाखू व्यसनमुक्त झाले आहेत. विविध स्तरावर तंबाखू खाणाऱयांकडून 78 हजारांचा दंड वसुल करण्यात यश आले आहे.
सीपीआर हॉस्पिटलमधील ग्रामीण हॉस्पिटल सेलमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची शाखा आहे. येथे जिल्हा सल्लागार म्हणून चारुलता कणसे यांच्यासह क्रांती शिंदे, प्रियांका लिंगाडे कार्यरत आहेत. या तीन महिलांनी तंबाखू विरोधात समुपदेशाचे काम हाती घेतले आहे. या विभागाकडून अंमली पदार्थ विरोधी दिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी जयंती, प्रजासत्ताक दिन, जागतिक कर्करोग दिनी जनजागृती सप्ताह आयोजित केले जातात. या काळात विविध स्पर्धा, उपक्रम घेतले जातात. पण कोरोनामुळे जनजागृतीवर मर्यादा आल्या. तरीही ऑनलाईन जागृतीचा आधार या विभागाने घेतला.
विभागांतर्गत जिल्हÎात 11 समुपदेशन केंद्रे आहेत. वर्षभरात तेथे 2 हजार 191 जणांची नोंद झाली. त्यापैकी 82 जणांना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे. जिल्हÎात 58 तंबाखुमुक्त शाळा आहेत. तसेच 113 तंबाखूमुक्त आरोग्य संस्था आहेत. आजपर्यत या विभागाने तंबाखूसेवन करणाऱया 342 जणांवर ंदंडात्मक कारवाई केली आहे. आरोग्य विभागाने 4 हजार 100, पोलीस दलाने 68 हजार 250 आणि अन्न आणि औषध प्रशासनाने 5 हजार 400 रूपये दंड वसुल केला आहे. वर्षभरात 77 हजार 750 रूपयांचा दंड वसूल झाला आहे.
विभागाने तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू विरोधी जागृतीसाठी शालेय स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य, निबंध स्पर्धांचा समावेश होता. जिल्हÎातील सर्व शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये 384 विद्यार्थ्यांनी प्रथम, 390 विद्यार्थ्यांनी द्वितीय, 378 विद्यार्थ्यानी तृतीय क्रमांक मिळवला. कोरोना काळातही 1 हजार 152 विद्यार्थ्यांना याद्वारे तालुकास्तरावर बक्षीस वितरण करण्यात आले.
गतवर्षी गांधी जयंतीला कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता आले नाही. पण टाटा मेमोरीयल हॉस्पिटलच्यावतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विभागातील प्रियंका लिंगडे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. प्रजासत्ताकदिनी टाटा मेमोरीयल हॉस्पिटल व सेटर फॉर इंपीडीमियॉलॉजी च्यावतीने राज्यस्तरीय तंबाखूविरोधी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विभागातील क्रांती शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. चारूलता, क्रांती आणि प्रियांका या तिघींनी तंबाखूविरोधात कोरोना काळात ऑनलाईन जागृतीवर भर दिला आहे. व्यसनमुक्तीत त्यांचा हा खारीचा वाटाही दिशादर्शक ठरला आहे.