जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांची आरोग्य विभागाला सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना चाचण्या वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी आरोग्य विभागाला केली आहे. त्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱयांनी बुधवारी बिम्समध्ये आरोग्य विभागातील अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत चाचण्या वाढविण्याबरोबरच तातडीच्या उपचारावर भर देण्याचे जिल्हाधिकाऱयांनी सूचित केले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बेळगाव जिल्हय़ातही रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर महाराष्ट्रासारखी अवस्था बेळगावात निर्माण झाली तर प्रत्येकांना उपचार पुरविणे आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन, ऍम्ब्युलन्स, बेडची संख्या याची तयारी करण्याबरोबरच बाधितांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकाऱयांनी आरोग्य विभागाला सांगितले. कोरोनाचा फैलाव थोपविण्यासाठी बाधितांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची गरज आहे. तरच फैलाव रोखता येणार आहे. यासाठी चाचण्या वाढविण्याची गरज आहे. बाधितांवर वेळेत उपचार मिळाल्यास मृत्यूचे प्रमाणही कमी करता येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने चाचण्या वाढविण्याची गरज आहे.
उपचारासाठी येणाऱया प्रत्येक रुग्णावर सरकारच्या मार्गसूचीनुसार उत्तम उपचार मिळावेत. उपचाराच्या बरोबरीनेच लसीकरणाच्या कामालाही वेळ मिळावा. असे सांगत जिल्हाधिकाऱयांनी बिम्समध्ये उपलब्ध असलेले बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था याचा आढावा घेतला. यावेळी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्जन डॉ. हुसेनसाब काजी, बिम्सच्या प्रशासकीय अधिकारी सय्यद आफरीनबानू बळ्ळारी, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी बसवराज तुक्कार आदी उपस्थित होते.