ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने शुक्रवारी व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. या रॅलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सपाच्या व्हर्च्युअल रॅलीदरम्यान स्वामी प्रसाद मौर्य, धरम सिंह सैनी यांच्यासह भाजपच्या आठ बंडखोर आमदारांनी सपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत कठोर भूमिका घेत पोलिसांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत पाच निवडणूक राज्यांमध्ये सार्वजनिक रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. तरी देखील सपाच्या व्हर्च्युअल रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.