रविवारपासून नवे निर्बंध देशात लागू
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना रविवारी स्वतःचा विवाह रद्द करणे भाग पडले आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नव्या लाटेनंतर कोरोना विषयक निर्बंध अधिक कठोर करण्यात आल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. आर्डर्न यांनी नव्या निर्बंधांची घोषणा करता ‘माझा विवाह सध्या होणार नसल्याची’ पुष्टी दिली आहे. न्यूझीलंडमध्ये आता कुठल्याही सोहळय़ात केवळ 100 लोकांना सामील होण्याची अनुमती असेल, तसेच या लोकांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे.
महामारीमुळे विवाह रद्द होण्याचा अनुभव घेणाऱया देशाच्या अन्य नागरिकांमध्ये मी देखील सामील झाली आहे. अशा स्थितीत सापडणाऱया कुठल्याही व्यक्तीसाठी मला खेद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यूझीलंडच्या एका कुटुंबात ओमिक्रॉनचे नवे बाधित सापडले आहेत. हे सर्वजण विवाह सोहळय़ात सामील होण्यासाठी प्रवास करत होते. कुटुंबाने ज्या विमानातून प्रवास केला होता, त्याची एक अटेंडेंट देखील बाधित आढळली होती. यामुळे न्यूझीलंडला रविवारी मध्यरात्रीपासून स्वतःचे ‘रेड सेटिंग’ निर्बंध लादणे भाग पडले आहे.
लवकरच होणार होता विवाह
ओमिक्रॉन डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत अधिक संक्रमक आहे. परंतु लोकांना गंभीर आजारी करण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जत आहे. गर्दी कमी करण्यासह सार्वजनिक परिवहन आणि दुकानांमध्ये आता मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. आर्डर्न आणि त्यांचे जोडीदार क्लार्क गेफोर्ड यांचा विवाह पुढील काही आठवडय़ांमध्ये होणार होता.
‘हेच जीवन आहे’
नवे निर्बंध किमान फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहेत. अशाप्रकारचे निर्बंध लादून स्वतःचा विवाह रद्द करावा लागल्यावर कसे वाटले असा प्रश्न आर्डर्न यांना विचारण्यात आला होता. ‘हेच जीवन आहे’, न्यूझीलंडमध्ये महामारीमुळे अत्यंत प्रतिकूल प्रभाव झेललेल्या हजारो लोकांपेक्षा मी वेगळी नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. महामारी सुरू झाल्यापासून देशात 15,104 रुग्णांची नोंद झाली असून 52 मृत्यू झाले आहेत.