प्रतिनिधी/ कराड
कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्यावतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जातो. 1932 पासून ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु असून 89 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 17 ऑक्टोबरपासून या शारदीय व्याख्यानमालेस ऑनलाईन प्रारंभ होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्र उत्सवातील ही शारदीय व्याख्यानमाला यु टय़ुबवर ऑनलाईन व स्थानिक केबलवर रोज सायंकाळी 6 वाजता प्रक्षेपित होणार आहे. यापूर्वी शारदीय व्याख्यानमालेमध्ये ज्या ख्यातनाम व्याख्यात्यांनी आपले विचारपुष्प गुंफले आहेत. अशा विचारवंतांची व्याख्याने रसिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कराडचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ म्हणून या व्याख्यानमालेने नावलौकिक मिळविला आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके व सर्व नगरसेवकांचे सहकार्य या व्याख्यानमालेस लाभत आहे. राज्यात अखंडपणे सुरू असणारी व्याख्यानमाला म्हणून या व्याख्यानमालेचा लौकिक आहे. यावर्षी कोरोना महामारी असल्याने गर्दी करण्यास अटकाव आहे. त्यामुळे ऑनलाईन व्याख्यानमाला होणार असून यापूर्वीची दर्जेदार व्याख्याने पुन्हा ऐकण्याची संधी कराडकरांना उपलब्ध झाली आहे.
265 वर्षांची परंपरा जपणारे कराड नगरवाचनालय आज शहराची शान बनले आहे. या वाचनालयाची स्थापनाच 1857 ची. हे वर्षच मुळात अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष. हे नगरवाचनालय व व्याख्यानमाला आजही वाचक, जिज्ञासू, अभ्यासूंची भूक भागविते आहे.
या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला, राजकारण, काव्य, कथाकथन, धार्मिक, अध्यात्मिक या विविध विषयावरील व्यासंगपूर्ण अभ्यासू व नामवंत वक्त्यांनी गेल्या 88 वर्षात 700 हून अधिक व्याख्यात्यांनी आपली व्याख्याने सादर केलेली आहेत. नगरवाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेशकर उत्कृष्ठ ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दर्जेदार व्याख्याने
शनिवार 17 ऑनलाईन व्याख्यानमालेचा शुभारंभ पुणे आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्या ‘नवरात्र महात्म्य’ या संग्रहित व्याख्यानाने होणार आहे. रविवार 18 रोजी मॅरेज काऊन्सेलर वंदना कुलकर्णी, पुणे यांचे ‘लग्नग्न समजून घेताना’, सोमवार 19 रोजी आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे ‘युवकांसमोरील आव्हाने’, मंगळवार 20 रोजी दास ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रा.लि.मुंबई येथील अशोक खाडे यांचे ‘जिद्द’ या विषयावर, बुधवार 21 रोजी सांगली येथील नेत्ररोग तज्ञ दिलीप पटवर्धन यांचे ‘जीवन जगणे कला’, गुरुवार 21 रोजी ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांचे ‘महासत्ता म्हणजे काय’, शुक्रवार 23 रोजी आयपीएस संदिप पाटील यांचे ‘स्पर्धा परीक्षा आणि पोलीस सेवेतील अनुभव’ शनिवार 24 रोजी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’, रविवार 25 रोजी आप्पासाहेब खोत यांचे ‘कथाकथन’ अशी एकुण 9 संग्रहित व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत.
या सर्व व्याख्यानाचा लाभ रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके व सर्व नगरसेवकांनी यांनी केले आहे. सर्व व्याख्यानांचे प्रसारण ऑनलाईन व केबलवर नियोजित वेळेत रोज सायं.6.00 वाजता प्रक्षेपित होणार आहे. याची लिंक देण्यात येणार आहे.