सोमवारी राज्यभरात 5 जणांचे बळी : 317 नवे रुग्ण : 213 जण झाले कोरोनामुक्त : फैलाव आटोक्यात येईना
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाचे राज्यातील बळी वाढतच असून सोमवारी 5 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे मृतांची संख्या आता 80 झाली आहे. सोमवारी नवीन 317 कोरोनाबाधित सापडले, तर 213 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 9029 वर पोहोचली असून 6208 जण बरे झाले आहेत. सध्या 2741 सक्रिय रुग्ण आहेत. नवीन 92 रुग्णांना संशयित म्हणून आयझोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी प्रकिया चालू आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आके मडगाव येथील 49 वर्षीय महिला, केपेचा 73 वर्षीय नागरिक, झुवारी नगरमधील 47 वर्षीय, इंदिरानगर चिंबल येथील 55 वर्षीय तर माशेल येथील 74 वर्षीय महिला या सर्वांचे सोमवारी गोमेकॉ व कोविड रुग्णालयात निधन झाले.
सोमवारी 317 नवे कोरोना बाधित
विविध हॉटेल्स, रेसिडन्सी येथे 61 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून 7 जणांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. काल सोमवारी 1898 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले, तर 2348 जणांचे अहवाल मिळाले. त्यात 317 जण नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून 730 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत, तर उर्वरीत अहवाल निगेटिव्ह मिळाले आहेत.
गोव्यात आलेल्या 2 प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी कोरोनाचे बळी जात असून संख्या वाढतच आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णही विविध ठिकाणी वाढत चालल्याने परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र आहे. विविध आरोग्य पेंद्रात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्याही वाढतच आहे. अनेक केंद्रांमध्ये रुग्णसंख्येची शंभरी गाठल्याचे समोर आले आहे. काही आरोग्य केंद्रातील कोरोनाबाधितांची नोंद दोनशे ते तिनशेपक्षाही जास्त पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड व्यवस्थापनासाठी
राज्याला 6 कोटी मिळणार
कोविड व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारतर्फे पुढील टप्प्यातील रु. 890.30 कोटीचा निधी देशातील बहुतेक सर्व 22 राज्यांसाठी व इतर केंद्रशासित प्रदेशांकरीता जारी केला असून त्यातील रु. 6 कोटी गोवा राज्याकरीता मिळणार आहेत. दरम्यान कोविड संकट चांगल्या पद्धतीने हातळण्यास यशस्वी ठरलेल्या विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची यादी केंद्राने जाहीर केली आहे. त्यात गोवा मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याने काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून ते आणि त्यांचे सरकार कोविड व इतर प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका पणजीकर यांनी केली आहे.
विविध आरोग्यकेंद्रांतीतल रुग्णसंख्या
- डिचोली 25
- सांखळी 84
- पेडणे 68
- वाळपई 108
- म्हापसा 103
- पणजी 103
- हळदोणा 35
- बेतकी 22
- कांदोळी 77
- कासारवर्णे 13
- कोलवाळ 54
- खोर्ली 73
- चिंबल 131
- शिवोली 19
- पर्वरी 71
- मये 26
- कुडचडे 49
- काणकोण 25
- मडगाव 254
- वास्को 384
- बाळ्ळी 55
- कासावली 58
- कुठ्ठाळी 258
- कुडतरी 67
- लोटली 40
- मडकई 38
- केपे 65
- सांगे 64
- शिरोडा 41
- धारबांदोडा 89
- फोंडा 175
- नावेली 60
- राज्यातील 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधित – 9029
- आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – 6208
- सध्या उपचार घेणारे सक्रीय रुग्ण – 2741
- 10 ऑगस्टचे नवीन रुग्ण – 317
- 10 ऑगस्टला बरे झालेले – 213
- 10 ऑगस्टचे मृत्यू – 5
- आतापर्यंतचे एकूण मृत्यू – 80
मडगाव कोविड हॉस्पिटलात : बळीची संख्या अर्धशतक पार
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलाचे एका रात्रीत कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले. सुरुवातीला या ठिकाणी रूग्ण आणले जायचे. नंतर सिम्प्टोमॅटिक रूग्णांची संख्या वाढल्याने हे हॉस्पिटल पूर्णपणे केवळ सिम्प्टोमॅटिक रूग्णांसाठीच वापरात आणले जाऊ लागले. या हॉस्पिटलात काल सोमवारपर्यंत 56 जणांचे बळी गेले आहेत. रविवारी रात्री व सोमवारी पहाटे मिळून तीन बळीची नोंद झालेली आहे.
सोमवार दि. 22 जून रोजी मोर्ले-सत्तरी येथील 85 वर्षीय रूग्णाचा गोव्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला होता. जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या आत कोविड हॉस्पिटलने बळीचे अर्धशतक पार केले आहे. विशेष म्हणजे यातील बऱयाच रूग्णांना अन्य आजारांची पार्श्वभूमी होती.
मडगावात सोमवारी तीन बळी
रविवारी रात्री 8.45 वाजता आकें-मडगाव येथील एका 49 वर्षीय महिलेचा बळी गेला. तिला रक्तदाब, मधुमेह अशा आजारांची पार्श्वभूमी होती. त्यानंतर सोमवारी पहाटे 1.15 वाजता केपे येथील 73 वर्षीय व्यक्तीचा बळी गेला. त्यालाही विविध आजारांची पार्श्वभूमी होती. त्यानंतर सकाळी 6 वा. जुवारीनगर-वास्को येथील 47 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. त्याला यकृताचा आजार होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
कोविड हॉस्पिटलात सद्या 190 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 19 जणांची प्रकृती नाजूक बनलेली आहे. काल दिवसभरात केवळ 4 रूग्णांना कोविड हॉस्पिटलातून डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी एकूण 21 नवीन रूग्णांनी कोविड हॉस्पिटलात प्रवेश केला होता.