कोरोनामुक्तीचे प्रमाणही 75 टक्क्यांवर : नव्याने 27 पॉझिटिव्ह, 130 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गेल्या आठ दिवसांपासून कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तणावाखाली असलेल्या जिल्हय़ातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असून दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी 27 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 130 रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्हय़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली. कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांचे प्रमाणही वाढले. त्यामुळे कोरोनावाढीची चिंता सर्वानाच सतावत होती. मात्र आरोग्य यंत्रणा आणि जनतेने कोरोना नियंत्रणासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. अर्थात दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी कोविडचे नियम प्रत्येकाने पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
जिल्हय़ात सातत्याने 80 ते 90 रुग्ण आढळत होते ती संख्या कमी झाली आहे. रविवारी 22, तर सोमवारी 27 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 60 झाली आहे. तर आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी 130 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 3 हजार 132 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 825 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
एकूण अहवाल 27378
पॉझिटिव्ह आलेले अहवाल 4060
निगेटिव्ह आलेले अहवाल 23253
प्रतीक्षेतील अहवाल 65
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण 825
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 103
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 3132
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3626
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4611