प्रतिनिधी / गुहागर :
गुहागर तालुक्यातील जामसूद येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचारासाठी कोविड सेंटर उभारणीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने अखेर या रूग्णाला मुलींच्या वसतिगृहात ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली.
प्रत्येक तालुक्यात कोवीड सेंटर निर्माण करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र गुहागरमध्ये अद्याप त्याला मुर्त रूप आलेले नाही. मंगळवारी जामसूद येथील दोघांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. यातील एकाचा रविवारी मृत्यू झाला होता. मृत रूग्णाच्या केअरटेकरचा अहवालही कोरोना पॉझिटीव्ह आल्याने 108 रूग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. मात्र या रूग्णाला दाखल कोठे करायचे हा मोठा प्रश्न गुहागर तहसीलसमोर निर्माण झाला.
या रूग्णाला वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी कॉलेजमधील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र पॉझिटीव्ह रुग्णाला दाखल करण्याबाबत संस्थाचालकांची परवानगी घेतली होती का? संस्थात्मक क्वारंटाईन केंद्रात असा रुग्ण दाखल करण्याची परवानगी आहे का? असे प्रश्न अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रशासनाने उपस्थित केल्यने गोंधळ निर्माण झाला.
गुहागरमध्ये पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी जामसूद, वेळणेश्वर या भागांना भेट दिली. सायंकाळी 7 वाजेपर्यंत जागा निश्चित नसल्याने पॉझिटीव्ह रूग्ण रूग्णवाहिकेमध्येच बसून होता. अशामध्ये गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या हॉस्टेलची जागा तहसिलदारांनी निवडली. ही जागा निवडताना केवळ शौचालय व मर्यादीत खोल्या पाहण्यात आल्या आहेत. सायंकाळी 7.30 वाजता पॉझिटीव्ह रूग्णाला त्या इमारतीच्या रूममध्ये ठेवून गोंधळलेल्या प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
कोविड केअर सेंटरची अधिकृत घोषणा नाही
कोविड केअर सेंटरसाठी 50 खाटांची व्यवस्था असलेली जागा आवश्यक आहे. परंतु अशा जागा शोधण्यात अपयश आले आहे. बंद असलेले निरामय रूग्णालयाचीही चाचपणी तहसिलदारांनी केली. मात्र रूग्णालय इमारतीची चावीच उपलब्ध झालेली नाही. यामुळे पॉझिटीव्ह रूग्णाला ठेवायचे कोठे या गेंधळामध्ये केवळ 7 खोल्या व चार शौचालये असलेली गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या हॉस्टेलची जागा निवडण्यात आली. सदर जागा ही कोवीड केअर सेंटरकरीता सक्षम नसल्याने बुधवारपर्यंत कोविड केअर सेंटरची अधिकृत सूचना केली नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
रूग्णाजवळ केवळ 1 पोलीस शिपाई
मुलींच्या हॉस्टेलच्या इमारतीमध्ये रूग्णाला ठेवण्यात आले असले तरी त्याठिकाणी आरोग्य विभागाची कोणतीही व्यवस्था नाही. ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱयांकडून रूग्णाला दोनवेळा भेट देऊन तपासणी करण्यात येत असून इमारतीबाहेर केवळ 1 पोलीस शिपाई ठेवण्यात आला आहे.
वसतीगृहाचे कोव्हीड सेंटमध्ये रूपांतर
खरे-ढेरे महाविलयातील मुलींच्या वसतीगृहाला कोवीड केअर सेंटरमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. जामसूद येथील कोरोना बाधीतामध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्याला शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या रूग्णात तीव्र लक्षणे दिसल्या त्याला जिल्हा कोव्हीड सेंटरमध्ये दाखल केले जाईल.