वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात धुमाकूळ घालणाऱया कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून अनेक दिग्गज खेळाडूसह क्रीडा संघटनाही केंद्र व राज्य सरकारला मदत करत आहेत. भारतीय ऑलिम्पिक महासंघ व भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांनीही पुढाकार घेत पंतप्रधान मदतनिधीसाठी मदत जाहीर केली आहे.
सध्य घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून देशातील प्रत्येकजण आपल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहे. देशातील नामांकित अशा भारतीय ऑलिम्पिक महासंघानेही आपले सामाजिक कर्तव्य जपताना 71 लाखांची मदत पंतप्रधान केअर फंडसाठी जाहीर केली आहे. आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी शुक्रवारी ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. देशाच्या कठीण काळात भारतीय ऑलिम्पिक महासंघ नेहमी अग्रेसर राहिला आहे. देशासाठी आणि नागरिकासाठी जे काही करता येणे शक्य आहे, ते आम्ही करत आहोत, या शब्दात मेहता यांनी आपल्या भावना मांडल्या.
दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हॉकी इंडियाने 25 लाख तर भारतीय फुटबॉल महासंघाने 25 लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी दिले आहेत. याशिवाय, बीसीसीआयसह सौराष्ट्र, मुंबई, कर्नाटक व पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनांनी मदत केली आहे.
नेमबाज अंकुर मित्तलचा लाख मोलाचा वाटा
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी नेमबाज अंकुर मित्तलने आपले सामाजिक भान राखत पंतप्रधान केअर फंडासाठी 1 लाख व हरियाणा राज्य सरकारच्या मदतनिधीसाठी 51 हजार रुपये दिले आहेत. याबाबतची माहिती त्याने ट्विटरद्वारे दिली. देशाच्या संकटमय काळात प्रत्येकाने पुढे येत मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. मी स्वत: पंतप्रधान व राज्य सरकारच्या केअर फंडासाठी मदत केली आहे. आता तुम्ही ही पुढे या, असे आवाहनही त्याने केले आहे.
पश्चिम बंगाल टेनिस संघटनेकडून मदत
कोलकाता : कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक संघटनांनी पुढाकार घेतला असून पश्चिम बंगाल टेनिस संघटनेनेही एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत बंगाल सरकारच्या केअर फंडाकडे जमा केली जाणार असल्याचे संघटनेचे सचिव मिहिर बात्रा यांनी सांगितले. तसेच याआधी बंगाल क्रिकेट संघटनेने 25 लाख, मोहन बगान फुटबॉल क्लबने 30 लाख तर ईस्ट बंगाल क्लबने 30 लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या केअर फंडाला दिली आहे.
साईचा पुढाकार, 76 लाखांची केली मदत
चंदिगड : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) पुढाकार घेत 76 लाखांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, क्रीडा प्राधिकरणातील अ वर्गातील कर्मचाऱयाने आपला तीन दिवसाचा, ब वर्गातील कर्मचाऱयाने दोन दिवसाचा तर क वर्गातील कर्मचाऱयाने एका दिवसाचा पगार देत ही मदत जाहीर केली असल्याचे साईच्या एका अधिकाऱयाने सांगितले. ही 76 लाखांची मदत पंतप्रधान केअर फंडाकडे त्यांनी शुक्रवारी जमा केली.
ही वार्ता कळताच केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी साईच्या प्रत्येक कर्मचाऱयांचे कौतुक केले आहे. साईच्या प्रत्येक कर्मचाऱयाने आपला पगार देत आपले सामाजिक कर्तव्य जपले असल्याचे ट्विट रिजिजू यांनी केले आहे. विशेष म्हणजे, क्रीडा मंत्री रिजिजू यांनी स्वत: एक कोटीची मदत पंतप्रधान केअर फंडाकडे जमा केली आहे.