प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाच्या साथीमुळे शाळेला सुट्टी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी किशोर मासिकाचे सर्व जुने अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले आहे.
कोरोनामुळे विद्यार्थी दीर्घकाळ सध्या घरीच आहेत. अशावेळी त्यांच्यासाठी काय करता येईल? असा विचार करण्यात आला. बालभारतीच्या किशोर मासिकाचे 1971 सलापासूनचे जुने सर्व अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 32 हजार पानांचे रंगीबेरंगी साहित्य इथे उपलब्ध आहे. कथा, कविता, ललित लेख, एकांकिका, नाटय़छटा, चित्रकथा, कोडी आणि हजारो चित्र यांचा हा खजिना आहे. हे साहित्य आपापल्या मुलांना उघडून द्या. ऑनलाईन डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून द्या. त्यातील गोष्टी, कविता वाचून दाखवा. त्यावर चर्चा करा. एकत्र बसून कोडी सोडवा, असेही आवाहन केंद्रे यांनी केले आहे.