सक्रिय रुग्णसंख्या 4175 : बरे होण्याचे प्रमाण 95.63 टक्के
प्रतिनिधी / पणजी
कोरोनामुळे मंगळवारी राज्यात 10 जण दगावले असून बळींची संख्या 2947 वर पोहोचली आहे. गत 24 तासात 327 नवीन बाधित सापडले तर 548 जण बरे झाले आहेत. त्यायोगे बरे होण्याचे प्रमाण 95.63 टक्क्यांवर वर पोहोचले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 4175 एवढी खाली आली आहे.
वर्षभरातील बाधितसंख्या 163048 वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण 155926 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी 3120 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात 327 बाधित सापडले. त्यातील 45 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 279 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
मंगळवारी बळी गेलेल्या 10 जणांसह एकूण बळींची संख्या 2947 वर पोहोचली आहे. त्यातील 5 जण गोमेकॉत दगावले. त्याशिवाय दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात चौघांचा तर दक्षिण गोव्यातील खाजगी इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 44 पासून 78 वर्षे वयोगटातील 7 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे.
एकूण 14 केंद्रात दोन अंकी रुग्णसंख्या
राज्यातील 33 पैकी फोंडा केंद्रात सध्या सर्वाधिक 439 रुग्ण उपचार घेत आहेत. त्या खालोखाल मडगाव आणि चिंबलमध्ये प्रत्येकी 248 तर पणजीत 221 रुग्ण आहेत. सध्या सर्वात कमी 28 रुग्ण कासारवर्णेत आहेत. डिचोली, वाळपई, म्हापसा, हळदोणे, कासारवर्णे, कोलवाळ, शिवोली, मये, कुडचडे, काणकोण, बाळ्ळी, चिंचिणी, धारबांदोडा व नावेली या केंद्रांमधील रुग्णसंख्या दोन अंकी संख्येवर आली आहे.
मंगळवारी 18,505 जणांचे लसीकरण राज्यात चालू असलेल्या टीका उत्सवास मंगळवारीही चांगला प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात 18,505 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात 45 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील 8165 जणांनी पहिला डोस, 155 जणांनी दुसरा डोस, टीका उत्सव-2 मध्ये 5211 जणांनी पहिला डोस, 9 जणांनी दुसरा डोस तर टीका उत्सव-3 मध्ये 18 ते 44 वयोगटातील 4965 जणांनी डोस घेतला. राज्यातील एकूण 42 केंद्रांमधून हे लसीकरण करण्यात आले. राज्यात लसीकरण प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत 6,60,956 जणांनी लस घेतली आहे.