प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील स्थानिक कलाकारांनी एकत्रित येत लेखक, दिग्दर्शक रोहित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या ‘देशी’ लघुपटाला फिल्मफेअरचा ‘बेस्ट पिपल चॉईस अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. मुंबईत फिल्मफेअर अवॉर्डच्या दिमाखदार सोहळय़ात अभिनेत्री सोनम कपूर यांच्या हस्ते निर्माता राजकुमार मोरे आणि दिग्दर्शक रोहित कांबळे आणि कलाकारांना गौरविण्यात आले. यावेळी करिना कपूर, विद्या बालन, कबीर बेदी, करण जोहर, रेणू डिसुजा आदी बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील उपस्थिती होती.
कोल्हापुरात कलाशिक्षक कॉ. मिलिंद यादव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चिल्लर पार्टी या लहान मुलांच्या चित्रपट चळवळीतून लघुपट तयार करण्याची संकल्पनाही राबविण्यात येते. त्यातून देशी या लघुपटाची संकल्पना पुढे आली. निर्माते राजेंद्रकुमार मोरे यांनी सर्वांच्या मदतीने ही जबाबदारी स्वीकारली. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी रोहित कांबळे यांच्यावर होती. ‘देशी’ मध्ये वेश्या व्यवसाय करणाऱया महिलेच्या मुलीला शाळेत प्रवेश घेताना कशा अडचणी येतात आणि त्याला ‘ती’ कशी सामोरे जाते हे वास्तव मांडले आहे. अभिनेत्री वीणा जामकरने नायिकेची भूमिका साकारली आहे. इतर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ स्थानिक कोल्हापूरचे आहेत. इतर सगळे कलाकार, तंत्रज्ञ कोल्हापुरातील आहेत. देशीला सांगलीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही सात पुरस्कार लाभले होते. त्यानंतर प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्काराच्या स्पर्धेत देशीला नामांकनही मिळाले होते. बेस्ट पिपल्स चॉईस अवॉर्डने देशीचा सन्मान हा मतदानाने झाला आहे. चिल्लर पार्टीच्या टीमसह स्थानिक कलाकारांनी ‘देशी’ला मतदान करण्याचे आवाहन केले होते. देशीतील कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
——————–
देशी लघुपटाची टीम
निर्माता ः राजकुमार मोरे
लेखक, दिग्दर्शक ः रोहित कांबळे
लघुपटाचे नाव ः देशी
कलाकार ः वीणा जामकर, गार्गी मिलींद नाईक, सुधीर जोशी, स्वरा कुरणे, ईशान महालकरी, उमेश नेरकर, एन. डी. चौगले, अनुजा बकरे, मोहीनी बोंद्रे
सहा. दिग्दर्शक ः विजय माळी, आर्ट दिग्दर्शक ः विकी बिडकर, छायांकनः जयदिप निगवेकर, पार्श्वसंगीत ः डॉ. जयभीम शिंदे, संकलन ः शेखर गुरव, मेकअप ः प्राण चौगले, स्टील फोटोग्राफी ः मयूर कांबळे, वेशभूषाः सुभाष कांबळे, केशभूषा ः मोहिनी चव्हाण, प्रॉडक्शन मॉनेजर ः भगवान कुरडे
राजेंद्रकुमार मोरेंचे मायबोलीतून मनोगत
फिल्मफेअरच्या झगमगटात सन्मान होत असताना निर्माते राजेंद्रकुमार मोरे यांनी देशीच्या निर्मितीचा प्रवास आणि कोल्हापुरी कलाकारांचे योगदान यावर मराठीतून मनोगत व्यक्त करत उपस्थितांच्या टाळय़ा घेतल्या.
—————
आमच्या कष्टाचा सन्मान
देशीच्या यशात कोल्हापूरकरांचे उदंड प्रेम लाभले. ते त्यांनी मतदानातून व्यक्तही केले. त्याचबरोबर देशीच्या चमूतील प्रत्येकाच्या कष्टाचा हा सन्मान आहे.
रोहित कांबळे (लेखक, दिग्दर्शक)