आठवड्यातून तीन दिवस होणार उड्डाण
प्रतिनिधी / कोल्हापूर
बेंगलोर-तिरुपती, हैदराबाद आणि मुंबई या शहरानंतर आता कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर २२ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरु होत आहे. इंडिगो कंपनीकडून सुरु होणारी विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार आहे.
कोल्हापूर हे बेंगलोर, तिरुपती, हैदराबाद आणि मुंबई या शहरांशी हवाईमार्गे जोडले गेले आहे. या चारही मार्गावरील विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. २०१७ साली ही विमानसेवा सुरु झाली असून आजपर्यंत हजारो प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावरही विमानसेवा सुरु करण्यासाठी तीन वर्षापासून प्रयत्न सुरु होता. या पार्श्वभूमीवर विमानतळांशी संबंधित अधिकारी आणि इंडिगो कंपनीकडून सर्व्हेही झाला. तीन दिवसापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन चर्चा केली असून २२ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर इंडिगो कंपनीच्या विमानाचे उडाण होणार आहे. सुरुवातीला तीन महिने सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी तीन दिवस ही सेवा राहणार आहे.
अहमदाबादवरुन सकाळी 8 वाजता उड्डाण होवून विमान कोल्हापुरात सकाळी १० वाजुन १५ मिनिटानी उतरणार आहे. यानंतर १०:४५ वाजता कोल्हापुरातून अहमदाबादसाठी उड्डाण होऊन विमान दुपारी १ वाजता पोहोचणार आहे. व्यापाराच्या निमित्ताने गुजरातहून कोल्हापूर, इचलकरंजी आणि कोल्हापुरातून गुजरातला जाणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मार्ग-कोल्हापूर-अहमदाबाद (गुजरात) विमान कंपनी-इंडिगो-78 आसनी आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार अहमदाबादहून सकाळी 8 वाजता उड्डाण-कोल्हापूरात सकाळी 10:15 आगमन कोल्हापूरातून सकाळी 10:45 उड्डाण-अहमदाबादमध्ये दुपारी 1 वाजता लँड अहमदाबाद-कोल्हापूर फ्लाईट क्र-6ई 7187 कोल्हापूर-अहमदाबाद फ्लाईट क्र-6 ई 7189 तिकिट-3500 रुपये |
प्रयत्नांना यश
कोल्हापूर-अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु होता. या प्रयत्नांना यश आले आहे. व्यापारी वर्गाला या विमानसेवेचा फायदा होणार असून प्रवाशांनी लाभ घ्यावा.
– धनंजय महाडिक, माजी खासदार