प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसिकरणाला 17 जानेवारीला सुरूवात झाली, सप्ताहभरात 22 टक्के कोरोना योद्ध्यांनी कोविशिल्ड लस टोचून घेतली आहे. सुरूवातीला 50 टक्क्यांखाली असलेले लसीकरण आता प्रतिदिन 65 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मिळणारा हा प्रतिसाद इतरांसाठी प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यांत कोरोनाचे 49 हजार हजार रूग्ण दिसून आले. कोरोनाने 1 हजार 721 जणांचा मृत्यू झाला आहे. पण काही हजारांत असलेली सक्रीय रूग्णसंख्या सद्यस्थितीत 63 इतकी आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. दरम्यान, देशभरात 17 जानेवारीला पहिल्या टप्प्यात उपचाराशी निगडीत घटकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाली, पहिल्या दिवशी या अभियानाला अल्प प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर हळूहळू प्रतिसाद वाढत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सेवा रूग्णालयात परिचारिकेला पहिली लस देण्यात आली. सीपीआर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पहिली लस घेतली. त्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार अशी सप्ताहातून 5 दिवस कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला जिल्ह्यात 11 लसीकरण केंद्रे होती, ही संख्या 13 वर पोहोचली आहे. प्रंटलाईन कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, आशा स्वयंसेविकांना पहिल्या टप्प्यात कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपवाद वगळता साईड इफेक्ट नसल्याचेच लस घेतलेल्या लाभार्थींनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 192 लाभार्थीनी लस घेतली. ही टक्केवारी 60 पर्यत होती. गुरूवारी 1 हजार 267 लाभार्थीनी लस घेतली, ही टक्केवारी 65 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात 17 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यत 10 दिवसांत सुट्टी वगळता सात दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू राहिले. या काळात 7 हजार 176 लाभार्थ्यानी कोविशिल्ड लस घेतली आहे. ही टक्केवारी 22 इतकी आहे. शासकीय आणि खासगी वैद्यकीय स्टाफमधील 49 हजार 19 जणांनी लस मिळण्यासाठी नोंद केली होती. प्रत्यक्षात 33 हजार 263 जणांना लस घेण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यांची माहिती अपलोड झाली आहे. अद्यापी 15 हजार 776 लाभार्थी प्रलंबित आहेत. पण वास्तवात सप्ताहभरात 22 टक्के लाभार्थ्यांनी लस घेतल्याने जिल्ह्याची पहिल्या टप्प्यातील वाटचाल उद्दिष्टपुर्तीकडे सुरू आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात 20 केंद्रांवर प्रतिबंधक लस,
गुरूवारी 65 टक्के लसीकरण उद्दिष्टपुर्ती,
आजपर्यत 7,176 जणांनी घेतली लस,
दिवसभरात 1,267 लाभार्थ्यांना लसीकरण
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविकांना लस