प्रतिनिधी / कोल्हापूर
डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल शासकीय तंत्रनिकेतनने दिला आहे. तरीही इमारतीच्या देखभाल दुरूस्तीकडे संस्थापकांचे दुलक्ष असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुलांचे प्राण धोक्यात घालून संबंधीत इमारतीत शाळा सुरू करू नये. शासकीय यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार इमारतीची दुरूस्ती करा. अन्यथा शाळा चालवण्याची आमची क्षमता नसल्याचे लेखी पत्र द्या, आम्ही शाळेची पर्यायी व्यवस्था करू, अशा सूचना शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे आणि मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासक शंकर यादव यांनी संस्था अध्यक्ष परशुराम जाधव यांना दिल्या.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती यांच्या मागणीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती व शिक्षण उपसंचालक उपस्थित होते. या बैठकीत श्रीधर सावंत विद्यामंदिरच्या इमारतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. चर्चे दरम्यान शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा संबंध काय? असे संस्था अध्यक्ष जाधव यांनी म्हंटल्यानंतर एकच गोंधळ उडाला. कृती समितीच्या सदस्यांनी शासनाचा संबंध नसेल तर शाळेची मान्यता काढून घेण्याची मागणी केली. यावर मध्यबिंदू काढत शासकीय तंत्रनिकेतनच्या अहवालाशिवाय कोणत्याच इतर संस्थेचा स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल ग्राहÎ धरला जाणार नाही.
त्यामुळे संस्थापकांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या अहवालानुसार 31 डिसेंबरपुर्वी इमारतीची व्यवस्था करावी, अन्यथा शाळा बंद केली जाईल, अशा सूचना महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासक शंकर यादव यांनी संस्थापकांना दिल्या. परंतू कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांनी लेखी आदेश देण्याचा आग्रह धरला. त्यानंतर लेखी पत्र देवून शासन नियमानुसार शाळेच्या इमारतीचे काम करून घेण्याचे आदेश दिले. बैठकी दरम्यान संस्थापक आणि कृती समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. शिक्षण उपसंचालकांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केले. संस्थापकांनी शासन नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, चंद्रकांत सुर्यवंशी, भाऊ घोडके, भिमराव पाटील, विकास पिंगळे, सुधाकर सावंत, मनोहर सरगर, अभिजित कदम, महादेव गावडे, राजेंद्र कोरे, महेश जाधव, रामभाऊ कोळेकर आदी उपस्थित होते.
शाळेची दुरूस्ती होईपर्यंत तेथे वर्ग भरू नयेत
शासकीय तंत्रनिकेतनने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटनुसार इमारत पूर्ण होईपर्यंत संबंधीत इमारतीत वर्ग भरवू नये, तोपर्यंत अन्य ठिकाणी शाळेचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी दिल्या.