वार्ताहर/गोकुळ शिरगाव
उजळाईवाडी ता. करवीर येथील श्रीराम कॉलनी मधील एका 54 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ही महिला १ मार्च रोजी संधीवात उपचारासाठी चिपळूण वरून श्रीराम कॉलनी उजळाईवाडी मध्ये रहावयास आलेली होती. मात्र ही महिला कोणाच्या संपर्कात आलेली नसली तरी या महिलेस कोरोणा नेमका कोणाच्या संपर्कात आल्यामुळे झाला, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
ही महिला एका खासगी हॉस्पिटल येथे संधीवातावरील उपचारासाठी गेलेली असता दोन दिवसांपूर्वी स्वॅब घेण्यात आला होता. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण उजळाईवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह गावात सापडल्याने ग्रामपंचायत व गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण यांनी उजळाईवाडी गाव तीन दिवसासाठी पूर्ण सील करण्यात येणार असून गावामधील सर्व व्यवहार तीन दिवसासाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये गावातील कोणीही व्यक्ती बाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे याठिकाणी सांगितले.