स्थानिक लोकप्रतिनीधी व युवकांच्या प्रयत्नातून विधायक सामाजिक कार्य : वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
परिसराला लाभली ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय परंपरा : राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा
शाहू कालीन वाघाची तालीम व उत्तरेश्वराचे प्राचीन मंदिर
शहरातील ग्रामीण भागाचे वातावरण लाभलेला परिसर, 80 पेक्षा अधिक मंडळांचा `संयुक्त उत्तरेश्वर’
नंदकुमार तेली / कोल्हापूर
शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीचा धगधगता केंद्रबिंदू असेलेल्या उत्तरेश्वर पेठेत या परंपरेला साजेसेच एक भव्य व्यासपीठ उभे राहिलेले आहे. शहरातील प्रमुख, शेती, दुग्ध व्यवसाय, कौलारु घरे, म्हैशीचा गोठा असा ग्रामीण वातावरण लाभलेल्या परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. या परिसरात एकुण 80 पेक्षा अधिक तरूण मंडळे असून उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीमीच्या सर्व उपक्रमांना एकत्र (संयुक्त उत्तरेश्वर) येतात.
एकेकाळचा ‘शेकाप’चा गड
उत्तरेश्वर पेठ परिसर हा त्या काळातील प्रमख राजकीय पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. या ठिकाणी राजकीय प्रमुख केंद्र असल्याने प्रशासनावर वचक होता. तालीमीचे वस्ताद, मल्लांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे राजर्षी शाहू महाराज यांनी वाघांची तालीम असा गौरव केला. तेव्हापासून उत्तरेश्वर (महादेवाचे नाव) प्रासादिक (सार्वजनिक) वाघाची तालीम असे नाव पडले. या तालमीच्या इमातीच्या भिंतीवरील वाघाचे रंगीत चित्र अनेक वर्षे लक्षवेधी ठरले होते. गवत आड्डा, घरोघरी दुग्ध व्यवसाय व शेती व्यवसाय असल्याने शहरातील असूनही येथील वातावरण ग्रामीण आहे. एककाळचे बहुजन समाजाचे प्रतिक असणाऱया उत्तरेश्वर पेठेने आता चांदीच्या कलाकुसर क्षेत्रातही देशभर नावलौकिक मिळविला आहे.
19 फुट लांब व 16 फुट रुंद व्यासपीठ
ओम तरुण मडळच्या अबालवृध्दांचे प्रयत्न, परीश्रमातून व नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी स्वनिधीतून हे भव्य व्यासपीठ उभारले आहे. जुन्या लहान व्यासपीठाचे रुपांतर मोठया व्यासपीठामध्ये झाले आहे. व्यासपीठ 19 फुट लांब, 16 फुट रुंद तर सव्वातीन फुट उंच आहे. शिवजयंती, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, विवाह आदींसह विविध कार्यक्रमांसाठी या व्यासपीठाचा होतो. नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांमुळे जिल्हयात तालमीचा नावलौकिक आहे. आजअखेर अक्षरधाम मंदिर, स्वामी नारायण मंदिर, केदारनाथ मंदिर आदींच्या लक्षवेधी प्रतिकृती उभारल्या आहेत. राजर्षी शाहूंनी शिकार केलेला वाघ तालमीच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आला आहे. तालमीचे विद्यमान अध्यक्ष दिपक काटकर तर ओम तरुण मंडळाचे शामराव पाटील-घरपणकर असल्याची माहिती युवराज जाधवराव यांनी दिली.
80 मंडळांचे एकत्रित ‘संयुक्त उत्तरेश्वर’
या परिसरात प्रसिध्द उत्तरेश्वर महादेव मंदिर असून नंदी हा मंदिराच्या आत आहे. म्हैसुरनंतर कोल्हापुरातील उत्तरेश्वराचे मंदिर हे देशातील मोठी पिंड असणारे दुसरे मंदिर आहे. वारकरी संप्रदाय असून आषाढी एकादशीला दरवर्षी पायी दिंडी निघते. अनुगामिनी मंदिर, काळभैरव मंदिर, न्यायमुर्ती रानडे शाळा, मर्दानी खेळाचा आखाडा, महादेव भजनी मंडळ, क्रिकेट व फुटबॉल संघ आदी परिसराचे वैभव आहे तालमीतर्फे महाशिवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती, त्र्यांबोली यात्रा, नवरात्रोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांसह आयोजीत विविध कार्यक्रमांना 80 पेक्षा अधिक मंडळे एकत्र येतात. यामुळे `संयुक्त उत्तरेश्वर’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे.