प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कागल पंचतारांकित एमआयडीसीसह शहरातील शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवार नगर आणि पांजरपोळ या लघु औद्योगिक वसाहतींचा सहभाग असणार आहे. या सर्व एमआयडीसीतील संपूर्ण उद्योग 16 ते 23 मे या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहेत. आमदार चंद्रकांत जाधव यांनी ही माहिती दिली. गुरूवारी या संदर्भात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱयांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने जिह्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर इंजक्शनची कमतरता, या पार्श्वभूमीवर कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापुरातील एमआयडीसी बंद ठेवण्याबाबत औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची जबाबदारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली होती. आमदार जाधव यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, हर्षद दलाल यांच्याबरोबर गुरूवारी केलेल्या चर्चेत सहकार्याचे आवाहन केले. आमदार जाधव यांच्या आवाहनास प्रतिसाद देत रविवार 16 ते 23 मे एमआयडीसी बंद ठेवण्याचा निर्णय औद्योगिक संघटनांनी घेतला.
3200 उद्योग आणि 62 हजार कामगार
शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कागल पंचतारांकित एमआयडीसीसह शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवार नगर आणि पांजरपोळ येथे एकूण लहान, मध्यम आणि मोठे असे 3200 उद्योग असून 62 हजारहून अधिक कामगार आहेत. लॉकडाऊनच्या काळात हे सर्व उद्योग बंद राहणार असल्याने कामगारही घरीच राहणार आहे. व्यवहारही ठप्प होणार आहेत.
कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी इतर व्यवसाय, उद्योगाबरोबरच एमआयडीसीतील उद्योगही बंद ठेवण्यासंदर्भात औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. – आमदार चंद्रकांत जाधव