संजीव खाडे/कोल्हापूर
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव हे सध्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात अग्रभागी राहून शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जनजागृती करत आहेत. नागरिकांना सुरक्षेचे आवाहनही करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय असो महानगरपालिका असो अथवा महापालिकेची दवाखाने असो किंवा सीपीआर रूग्णालय असो. येथील प्रत्येक अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून आमदार जाधव कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाय योजनेची माहिती घेऊन सूचना करत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर दोन तीन दिवसापूर्वी एक वेगळाच अनुभव आमदार जाधव यांच्याकडून एका मॉलच्या व्यवस्थापनाला आला. संयमी, सभ्य अशी प्रतिमा असणाऱ्या आमदार जाधव यांचा पारा अचानक चढला. त्याला कारण असं होतं की, ताराबाई पार्क मधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झालेली गर्दी. आमदार जाधव आयुक्त निवास स्थानाजवळील महापालिकेच्या कार्यालयातील बैठक आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयाकडे निघाले होते. यावेळी त्यांना ताराबाई पार्क मधील एका मॉलमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी केलेली गर्दी दिसली. त्यांनी आपली गाडी थांबवून आत पाहिले असता मॉल व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कोणत्याही प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या नसल्याचे दिसून आले.
एकीकडे कोरोना विरुद्ध सारा देश गंभीरपणे लढत असताना मॉल व्यवस्थापन मात्र गंभीर नसल्याचे दिसल्याने आमदार जाधव चांगलेच संतप्त झाले. त्यांनी प्रथम येथे असणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करण्याची विनंती केली. तसेच मास्क आणि सँनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही केले. त्यानंतर मॉलच्या व्यवस्थापकाला बोलवून आमदार जाधव यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली. मी सगळे पाहिले आहे. कोरोना विषयक दक्षता घेत असल्याचे खोटे सांगू नका. नाहीतर कानाखाली लावेन. यापुढे ग्राहकांची व्यवस्थित काळजी घ्या. मॉलमध्ये मास्क, सँनिटायझर आदी सुविधा द्या. ग्राहकांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून काउंटर त्या पद्धतीने सुरू करा, ग्राहक आणि मॉलमधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या,असे सांगत आमदार जाधव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. आमदार जाधव आणि मॉल व्यवस्थापक यांच्यात झालेल्या संवादाची क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली असून त्याची चर्चाही शहरात रंगू लागली आहे.