दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची उद्या घोषणा, सत्ताधारी फुलेवाडीत तर विरोधकांची अजिंक्यतारावर खलबते
प्रतिनिधी / कोल्हापूर
राजकीय प्रतिष्ठापणाला लावलेलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीसाठी पॅनेलची बांधणी करण्यासाठी सोमवारी दिवसभर दोन्ही आघाडीच्या नेत्यांची खलबते सुरू होती. विरोधी शाहू आघाडीची अजिंक्यतारा तर सत्तारुढ गटाच्या नेत्यांनी फुलेवाडी येथे खलबते सुरु होती. तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये काही नावावर एकमत न झाल्याने मंगळवारी दि.२० रोजी सकाळीच दोन्ही आघाड्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
दोन्ही आघाडीकडील उमेदवारांची नावे निश्चित झाली असली तरी एक दोन नावामध्ये फेरफार करण्यावरुनच दिवसभर खल सुरू होता. अजिंक्यतारा कार्यालयात सोमवारी दुपारी 12 वाजता पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची बैठक सुरू होती. पॅनेलमधील नावावर बराच वेळ चर्चा झाली. यावेळी माजी खासदार निवेदीता माने यांनीही विरोधी आघाडीच्या नेत्यांची भेट घेवून चर्चा केली.
सत्तारुढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलची चर्चा झाली. सोमवारी दिवसभर या तिन्ही नेत्यांसह चेअरमन रविंद्र आपटे, संचालक रणजितसिंह पाटील व विश्वास जाधव यांच्यात एकत्रीत बैठक सुरू होती. विरोधी आघाडीकडील काही नाराजांनी संपर्क केल्याने एक दोन जागांमध्ये आदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत यावर खल सुरू होता.