प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सोमवारी 28 जणांची तपासणी झाली. आंतररूग्ण विभागात 106 जण उपचार घेत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उचत येथील कोरोनामुक्त तरूणाच्या 48 वर्षीय मातेचा दुसरा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संस्था 11 राहिली. सोमवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी एकही रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला नाही, दिवसभरात 135 जणांची तपासणी करून 55 जणांचे स्वॅब घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याशिवाय नागाळा पार्क येथील पॉझिटिव्ह तरूणाचा पुनर्तपासणी अहवाल अद्यापी प्रलंबित आहे.
सीपीआर कोरोना हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळपर्यत 28 रूग्ण तपासले. त्यात 25 नव्या संशयित रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आंतररूग्णांची संख्या 98 वर पोहोचली आहे. रविवारी पाठवलेल्या अहवालांपैकी 40 स्वॅब रिपोर्ट चार रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत सीपीआरमध्ये 7 पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 25 जणांचे स्वॅब शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलें आहेत. उचत येथील 48 वर्षीय महिलेचा दुसरा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. मराठा कॉलनी येथील वृद्धेला न्यूमोनियाचा त्रास असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत.
जिल्हय़ात सोमवारी देशातर्गत प्रवास केलेल्या 160 जणांची तपासणी केली. त्यापैकी 135 जणांना उपचारार्थ दाखल करून घेतले आहे. त्यातील 55 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये 97 जणांची तपासणी करून 29 जणांचे स्वॅब घेण्यात आले. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये 12 जणांची तपासणी करून 11 जणांचे स्वॅब घेतले. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले. अस्टॅर आधार हॉस्पिटलमध्ये 8 जणांची तपासणी करून तिघांचे स्वॅब घेतले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 14 जणांची, ऍपल सरस्वती आणि सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये एकाची तपासणी केली. दिवसभरात 135 जणांना दाखल करून 55 जणांचे स्वॅब रिपोर्ट तपासणीसाठी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.