वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आठ दिवसांत होणार उभारणी
300 आयसीयू तर 400 ऑक्सिजनेटेड बेडची सोय
डॉक्टरांसह वैद्यकीय स्टाफसाठी घेणार खासगी हॉस्पिटल्सची मदत
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 हजारांपर्यंत पोहोचली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि कोरोना बळींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जम्बो हॉस्पिटऐवजी सध्या असलेल्या हॉस्पिटल्स, केअर सेंटरमध्ये 700 बेड वाढवण्याची तयारी केली आहे. यामध्ये अतिदक्षता विभागात 300 बेड तर 400 ऑक्सिजनेटेड बेड आहेत. आठ दिवसांत याची उभारणी केली जाणार असून त्याचे व्यवस्थापन खासगी हॉस्पिटल्सवर सोपवले जाणार आहे.
जिल्ह्यातील रुग्ण संख्या 34 हजार 630 इतकी झाली आहे. येत्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाने 1 हजारांवर रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. कोरोना बळींची संख्या 1200 पर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना मृत्यू दर कमी करणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधासाठी शासकीय-निमशासकीय अशी 67 हॉस्पिटल आहेत. तसेच 44 केअर सेंटर, 15 हेल्थ सेंटर आहेत. तसेच खासगी तत्वावरील 50 हून अधिक केअर सेंटर कार्यरत आहेत, सध्या अतिदक्षता, ऑक्सिजनेट अशा बेडवर 10 हजार हायरिस्क रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्याची वाढणारी रुग्णसंख्या पाहता 15 दिवसांत रुग्णसंख्या 50 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोना बळींची वाढ होण्याची भीतीही आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जंम्बो हॉस्पिटलऐवजी बेडची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील सीपीआर, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, आयजीएम हॉस्पिटलसह अन्य केअर सेंटरवर बेडची संख्या वाढवली जाणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभागात 300 तर 400 ऑक्सिजनेटेड बेडचा समावेश आहे. यातील 200 बेड सीपीआर हॉस्पिटलमध्ये वाढवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नव्याने होणार्या बेडचे व्यवस्थापन खासगी हॉस्पिटल्सकडे
नव्याने 700 बेड वाढवल्यासशासकीय डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफवर ताण येण्याचा धोका आहे त्यामुळे नव्याने उभारण्यात येत असलेल्या या आयसीयू, ऑक्सिजनेटेड बेड, वॉर्डवर खासगी डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ नियुक्त केला जाणार आहे. खासगी हॉस्पिटल्सद्वारे या वॉर्डचे व्यवस्थापन केले जाणार आहे. औषधे, अन्य साधनसामग्री शासकीय यंत्रणा देणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली असून हॉस्पिटल व्यवस्थापनाला वैद्यकीय स्टाफसाठीचा खर्च शासनाकडून दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.