संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या रोगाचा प्रसार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे गर्दी, लोकांचा समूह आहे. दुग्ध व्यवसायात ज्या ज्या ठिकाणी दूध संकलन केले जाते. त्या त्या ठिकाणी त्याच गावातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक दूध पुरवठा करण्यासाठी व दूध ग्राहक म्हणुन संस्थेत येत असतात. त्यामुळे प्राथमिक दूध कर्मचाऱ्यांना अधिक धोका आहे. त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस मिळावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा दूध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले आहे.
अत्यावश्यक सेवेत सामोरे जाणारे आमचे कर्मचारी बांधव या रोगाच्या भीतीच्या छायेखाली सध्या वावरत आहेत. त्यांना या रोगाचा प्रतिबंध असणाऱ्या लसीचा पहिला व दुसरा डोस देणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून त्यांना लागण होणार नाही आणि त्यांच्याकडून इतरांना लागण होणार नाही, हे अतिशय महत्त्वाचे आहे. याकरिता या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अठरा वर्षावरील दूध कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून द्यावी. दूध उत्पादन अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेत येत असल्याने सदरची लस तातडीने आमच्या दूध कर्मचाऱ्यांना मिळावी असे निवेदानत म्हटले आहे.
निवेदन देते वेळी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरुणकुमार डोंगळे, बाबासाहेब चौगले, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, खजिनदार, सुरेश गुंडा जाधव, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील उपस्थित होते.