सीपीआरमध्ये निदर्शने, वैद्यकीय अधिकारी, सहयोगी प्राध्यापकांचा समावेश, चार महिन्याचे थकीत वेतन देण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलमधील कंत्राटी डॉक्टरांना चार महिने मानधन मिळालेले नाही. हे थकीत मानधन तातडीने मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी, 22 रोजी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, सहयोगी प्राध्यापक निदर्शने करणार आहेत. तसेच बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी ठोक मानधनावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती तात्पुरती आहे. चार महिन्यांपासून त्यांना मानधनही मिळालेले नाही. त्यामुळे बऱयाच कंत्राटी डॉक्टरांना घरखर्च चालवणे अवघड झाले आहे. काहीचे बँक हप्तेही थकले आहेत, पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत कंत्राटी डॉक्टरांचे वेतन पीएलए फंडातून होत आहे. पण कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पीएलए फंडातून मानधन देण्यास ट्रेझरी ऑफीसकडून नकार दिला जात आहे. तरी पीएलएमधून मानधन मिळावे, अशी मागणी आहे.
कंत्राटी डॉक्टरांना पुर्वीप्रमाणे वेतनश्रेणी 1 मधून वेतन मिळावे, बुधवारी रात्रीपर्यत वेतन न मिळाल्यास गुरूवारी, 22 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी डॉक्टरांनी दिला आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांसह पालकमंत्री, आरोग्यमंत्री, वेद्यकीय शिक्षणमंत्र्यांना दिल्याची माहिती डॉ. विकास जाधव, डॉ. अक्षय बाफना यांनी दिली.