अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, लक्षणे दिसल्यानंतर शुक्रवारी केली होती चाचणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी जलव्यवस्थापन बैठकीला उपस्थित असलेल्या या पदाधिकाऱ्याला सर्दी, ताप आणि खोकला ही कोरोनासदृष्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) केली होती. या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेत शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीची सभा ऑनलाईन पार पडली. त्यामुळे एक पदाधिकारी वगळता या सभेस इतर पदाधिकारी उपस्थित नव्हते. पण सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि काही कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बजरंग पाटील यांना सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे त्यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आली. या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यांच्या घशातील स्त्राव देण्यात आला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शनिवारी सकाळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
संपर्कात आलेले अधिकारी झाले कॉरंटाईन
शुकवारी दिवसभरात जलव्यवस्थापन समिती सभेमध्ये स्वीय सहाय्यकासह, सर्व विभागांचे विभागप्रमुख आणि काही कर्मचारी अध्यक्ष पाटील यांच्या संपर्कात आले होते. हे सर्व कर्मचारी कॉरंटाईन झाले आहेत.