वार्ताहर / गोकुळ शिरगाव (कोल्हापूर)
तिरुपती मंदिर बंद असल्याने कमी प्रतिसाद मिळणारी इंडिगो एअरलाइन्सची कोल्हापूर- तिरुपती ही विमानसेवा गुरुवार ता.११ जून पासून ३० जून पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर एक जुलैपासून मुंबईसह तिरुपती विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर विमानतळावरून लॉक डाउन नंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ स्थगित असलेली विमानसेवा २५ मे पासून नियमितपणे सुरू आहे. आत्तापर्यंत ८६ विमानांचे आगमन झाले असून याद्वारे १५१७ प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला आहे. ‘रीजनल कनेक्टिविटी स्कीम’ अर्थात ‘उडान’ योजनेअंतर्गत देशांतर्गत विमान सेवेला मिळालेला हा covid-19 च्या परिस्थितीनंतरचा सर्वोत्तम प्रतिसाद या ठिकाणी लाभला आहे.
तिरुपती विमानसेवा बंद राहणार असल्यामुळे रोजच्या आठ विमानाच्या ऐवजी सहा विमानाचे आगमन होणार आहे. दरम्यान कोल्हापूर विमानतळावर केंद्रशासन व राज्य शासनाने कोरोना संसर्गापासून बचावासाठी आखून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन केले जात असून विमानतळावरून ‘कॉन्टॅक्ट लेस जर्नीचे’ प्रयोजन केले जात आहे. त्यामुळे विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित असून विमान प्रवासादरम्यान कोणालाही कोरोना संसर्ग झाल्याची नोंद नाही अशी माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली.