सोळांकूर येथे जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू : काळम्मावाडी धरणातील जॅकवेलमधील पाणी उपसाही सुरू
प्रतिनिधी / कोल्हापूर
थेट पाईप लाईन योजनेतील पाईप लाईन गावातून टाकण्यास सोळांकूर (ता. राधानगरी) मधील ग्रामस्थांनी विरोध केला होता. पण महापालिका प्रशासन आणि सोळांकूर ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चा आणि बैठकीनंतर पुढचे पाऊल पडले आहे. सोळांकूर गावातून पाईपलाईन टाकण्यास प्रारंभ झाला असून काळाम्मावाडी धरणातील जॅकवेलमधील पाणी उपसा करण्यासही सुरूवात झाली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात थेट पाईप लाईनच्या कामाला बेक लागला होता. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर डिसेंबर, जानेवारीत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वतः जातीने पुढाकार घेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी तथा उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह सोळांकूर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांशी प्रत्यक्षात गावात जाऊन चर्चा केली होती. त्यांच्या शंकांचे समाधान केले होते. त्यातून सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर गावातून पाईप लाईन टाकण्यास सोळांकूरकरांनी परवानगी दिली. त्यानुसार काम सुरू करण्यात आहे.
जॅकवेलमधील पाणी उपसा सुरू
काळम्मावाडी धरणातील जॅकवेलमधील बांधकाम आहे. पण पाणी असल्याने या कामात अडथळा आला होता. पण जॅकवेलमधील पाणी उपसा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. उपसा झाल्यानंतर बांधकामाला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी मार्च ते जून या दरम्यानचा साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी मिळणार
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीपर्यंत थेट पाईप लाईनचे पाणी कोल्हापूरवासीयांना देणार असे स्पष्ट करताना योजनेचे काम वेगाने करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व अडथळे पार पाडत दिवाळीला पाणी मिळेल, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.