कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 10 फुटानी वाढ
प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील श्री.क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज (दि.18) रोजी पहाटे 2 वाजता चालू सालातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. तर, गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 10 फुटाने वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने शिरोळ तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने दत्त देव संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. मुख्य मंदिरात पाणी आलेने श्रींची उत्सवमूर्ती प.प.नारायणस्वामी महाराजांचे मंदिरात ठेवणेत आली असून तेथे नित्योपचार चालू आहेत.
पावसाची संततधार सुरु असल्याने कृष्णा-पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात 10 फुटाने वाढ झाली. वाढलेल्या नदीच्या पाणी पातळीमुळे नदीकाठी असलेल्या कुरणात पाणी शिरत असून शेतकरी वर्गाची नदीकाठच्या मोटारी काढण्याची व नदीकाठी असलेले गवत कापून घेणेची धांदल चालू आहे. कृष्णा नदी पेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला जोरात प्रवाह आहे.
पाणी पातळीत 20 फुटांनी वाढ, नदीकाठी भीतीचे वातावरण
कृष्णा-पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत जलद गतीने वाढ झालेने मागील महापुराचे अनुभव पाहता शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे . महापूराच्या भीती सोबत कोरोनाची भीती असलेने शिरोळ तालुक्याची काळजी वाढली आहे.