महापालिका निवडणूक तयारी संदर्भात महत्वपूर्ण बैठक;
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भाजपच्या राज्य नेतृत्वाने गंभीरपणे घेतली आहे. बुधवार 6 जानेवारी रोजी मुंबईत महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे मान्यवर या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह निवडणूक संचलन समितीतील सदस्य मंगळवारी मुंबईला रवाना झाले.
येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे होम ग्राऊंड असणार्या कोल्हापूरची महापालिका जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी माजी खासदार धनंजय महाडिक आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची व्दिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर सदस्यांचीही समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, माजी महापौर सुनिल कदम, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेता विजय सुर्यवंशी, ताराराणी आघाडीचे माजी गटनेता सत्यजित कदम यांचा समावेश आहे. हे सर्व पदाधिकारी मुंबईतील बैठकीसाठी रवाना झाले.
फडणवीस, चंद्रकांतदादा करणार मार्गदर्शन
या बैठकीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, संघटन मंत्री विजय पुराणिक, यांच्यासह संघटन मंत्री मकरंद देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरच्या राजकीय स्थितीचा अंदाजही घेणार आहेत. या बैठकीनंतर कोल्हापूर भाजपची पुढील व्यूहरचना, नियोजन निश्चित होणार आहे.