वार्ताहर / खोची
महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत, खोची ता. हातकणंगले ग्रामस्थांचे ग्रामदैवत, जागृत देवस्थान श्री. भैरवनाथ-जोगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक विडासोहळा संपन्न झाला. नवरात्रातील पाचव्या माळेला साजरा केला जाणार्या या विडा सोहळ्याला भाविकांची तसेच उपवास कर्त्यांची मोठी उणीव जाणवत होती. मोजक्या सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. सालकरी पुजारी काशिनाथ गुरव यांच्यासह पुजारी, गुरव, गोसावी, डवरी उपस्थित होते.
खोची येथील भैरवनाथांच्या मंदिरात नवरात्रोत्सव सुरू आहे. परंतु कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी श्री भैरवनाथाच्या तीर्थ-अंगाराचे नवरात्र उपवासासह विविध कार्यक्रम शासन धोरणानुसार रद्द करण्यात आले आहेत. प्रथेप्रमाणे पारंपरिक विधी व दैनंदिन पूजा अर्चा सुरू आहे. त्याप्रमाणे आज नवरात्रातील पाचव्या माळेदिवशी पारंपरिक विडासोहळा साजरा करण्यात आला.
आज श्री भैरवनाथ यांची श्रीकृष्ण रूपातील व सहचारिणी जोगेश्वरी यांची विड्याच्या पानातील पूजा बांधण्यात आली होती. नवरात्रोत्सवानिमित्त सकाळी दहा वाजता ‘श्री’चा आरती सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर ‘श्री’ना पारंपरिक विड्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.