प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील अतिक्रमण हटविण्याबरोबरच अंबाबाई मंदिर परिसरातील शंभर मिटरपर्यतच्या फेरीवाल्यांना काढण्याच्या भूमिकेवर महापालिकेचे प्रशासन ठाम आहे. मंगळवारी ही कारवाई करण्याचा निर्धार करत सर्व सज्जताही करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीने कारवाईला विरोध केला आहे. शंभर मिटरच्या आत महापालिकेने पट्टे मारून तेथे फेरीवाल्यांना बसवावे. चुकीच्या पद्धतीने कारवाई करू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव कारवाईवरून संघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आठ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने शहरातील 8 फेब्रुवारीपासून शहरातील बेकायदेशीर केबिन्स, अतिक्रमणे काढण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर अंबाबाई मंदिराच्या शंभर मिटर परीघातील फेरीवाल्यांना हटविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. महापालिकेच्या इशाऱयानंतर फेरीवाला कृती समिती आक्रमक झाली होती. समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्यासह इतर पदाधिकाऱयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना कारवाई रोखण्याची विनंती केली होती. दरम्यान, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे रजेवर गेल्या होत्या. त्या सोमवारी सेवेत रूजू झाल्या. त्यामुळे सोमवारची कारवाई मंगळवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. इस्टेट विभागासह अतिक्रमण निर्मूलन विभागांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासक डॉ. बलकवडे यांची फिरती, पट्टे मारण्याचे आदेश
महापालिका प्रशासक डॉ. बलकवडे यांनी मंगळवारी दुपारी अचानकपणे महाव्दार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजोपाध्ये रोडवर फिरती करून पाहणी केली. तसेच नियमावलीनुसार पांढरे पट्टे मारण्याच्या सूचना दिल्या. यावेळी इस्टेट विभागाचे ऑफिसर सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडीत पोवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनीही सायंकाळी महाव्दार रोडवर कारवाईच्या पार्श्वभूमीवर फिरती करून माहिती घेतली.
दिवसभर घडामोडी, कायदेशीर सल्लागाराशीही संवाद
सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीने सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकातील पार्किंगमध्ये ठिय्या आंदोलन करून शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर आर. के. पोवार यांच्या निवासस्थानातील कार्यालयात बैठका घेतल्या. कारवाईच्या पार्श्वभूमीवर वकिलांचाही कायदेशीर सल्ला घेण्यात आला. तसेच आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेऊन त्यांनाही मार्ग काढण्याच्या दृष्टीने विनंती करण्यात आली.
पांढरे पट्टे मारून शंभर मिटरच्या आत व्यवसाय करू द्या ः आर. के. पोवार
दिवसभर कारवाईवरून घडामोडी सुरू असताना सायंकाळी आर.के. पोवार यांनी अंबाबाई मंदिराच्या शंभर मिटरच्या अंतरात पूर्वी बसणाऱया फेरीवाल्यांना पांढरे पट्टे मारून बसण्यास परवानगी देण्यात यावी, असे आवाहन महापालिकेला केले. ते म्हणाले, अंबाबाई मंदिर परिसरात गेली पन्नास वर्षांहून अधिक वर्षे अनेक फेरीवाले व्यवसाय करत आहेत. कायद्यानुसार फेरीवाला संबंधित ठिकाणी पन्नास वर्षे व्यवसाय करत असेल, तर त्याला तेथून हलविता येत नाही. महापालिका कोणत्या कायद्यान्वये कारवाई करणार आहे, तो कायदा त्यांनी आम्हाला दाखवावा, असे आव्हानही आर. के. पोवार यांनी दिले.
रात्री उशिरापर्यंत पांढरे पट्टे मारण्याचे काम
अंबाबाई मंदिर परिसरात शंभर मिटरच्या बाहेर पांढरे पट्टे मारण्यास सोमवारी रात्री प्रारंभ करण्यात आला. या पट्टÎात शंभर मिटरच्या आतील फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनधिकृत स्ट्रक्चर आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर मात्र कारवाई होणार आहे.
अंबाबाई मंदिरापासून शंभर मिटर आत असणाऱया फेरीवाल्यांना शंभर मिटरच्या बाहेर व्यवसाय करण्यासाठी पट्टे मारण्यात आले आहे. कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोमनपा
अंबाबाई मंदिर परिसरात अनेक फेरीवाले गेली पन्नास वर्षे व्यवसाय करत आहेत. त्यांना हटवितान येणार नाही महापालिकेने कारवाई करताना कोणता कायदा आहे ते सांगावे.
-आर. के. पोवार, निमंत्रक, सर्वपक्षीय फेरीवाला कृती समिती