जिल्ह्यात म्युकर मायककोसिसचे 5 बळी, 5 रूग्णांवर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार, काही संशयित रूग्णांवर घरीच उपचार सुरू,
टास्क फोर्सची सुचना, हालचाली गतिमान, वॉर्डमधील बेड संख्या आज निश्चित होणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांत म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) ची लक्षणे दिसत आहेत. सध्या अशा 5 रूग्णांवर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काही रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. म्युकर मायकोसिससंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ञांनी सुचना केल्या होत्या. त्यानुसार सोमवारी सीपीआरमध्ये झालेल्या बैठकीत म्युकर मायकोसिस रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचा निर्णय झाला आहे. या वॉर्डमधील बेडची संख्या मंगळवारी निश्चित होणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रतिदिन सरासरी 1300 ते 1500 पर्यत नवे रूग्ण दिसून येत आहेत. तसेच कोरोनाने सरासरी 50 ते 55 मृत्यू होत आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजारांवर आहे. देशात सर्वाधिक कोरोना मृत्यूची संख्या कोल्हापुरात आहेत, त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सने गेल्याच आठवड्यात सीपीआरला भेट दिली. कोरोना मृत्यू, वाढत्या रूग्णसंख्येमागील कारणे जाणून घेतली. सीपीआरमधील वैद्यकीय स्टाफला त्यांनी काही सुचनाही केल्या.
जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांत म्युकर मायकोसिस रूग्णांची संख्या वाढत आहेत. त्यातही मधुमेहींमध्यें हा संसर्ग अधिक आहे. आजपर्यत म्युकर मायकोसिसने 5 जणांचा बळी घेतला आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच्या निदानासाठी चाचण्या, औषधोपचाराचा खर्च अधिक आहे. त्यामुळे काही रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. त्यातूनच सीपीआर हॉस्पिटलमध्ये या रूग्णांवर उपचार व्हावेत, अशी मागणी वाढत होती.
राज्याच्या टास्क फोर्सने सीपीआरमधील बैठकीत म्युकर मायकोसिस रूग्णांकडे लक्ष द्या, अशी सुचना केली होती. सोमवारी राज्याच्या सचिवांनी ऑनलाईन घेतलेल्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. वासंती पाटील यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते. `सीपीआर’मध्ये म्युकर मायकोसिस रूग्णांवर उपचार सुरू करा, त्यासाठी वॉर्ड उभारण्याची सुचना सचिवांनी केली. त्यानुसार वॉर्डच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सीपीआरमध्ये म्युकर मायकोसिस वॉर्डसाठी मंगळवारी जागा निश्चित होणार आहे. याचवेळी किती बेड असावेत, हे निश्चित होणार आहे.
म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा
म्युकर मायकोसिस संसर्गित रूग्ण वाढत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. 14 दिवसाच्या इंजेक्शनचा कोर्स आहे. यातील एका इंजेक्शनची किंमत 3 हजारांइतकी आहे. ही इंजेक्शन परजिल्ह्यांतून काहींनी उपलब्ध केली आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर लक्ष ठेवावे, अशी मागणी वाढत आहे.