वार्ताहर / यड्राव
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील सर्व श्रमिक कुटंबांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावेत, तसेच त्यावरील उपचार मोफत व्हावेत असा दृष्टीकोन ठेवून महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत या आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. भविष्यात येथे १० आयसीयु बेड व १० जनरल बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
परिसरातील जवळपास १५ हजार श्रमिक कुटुंबाना याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री व पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ते यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट येथे उभारण्यात आलेल्या दवाखान्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे ए.एम.आय. समन्वयक विज्ञानंद मुंडे, संजय पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.
मंत्री यड्रावकर पुढे म्हणाले, श्रमिकांच्या कुटुंबाना सेवा-सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने आग्रही राहून ही आरोग्य सुविधा सुरु केली आहे. त्याच्या माध्यमातून इतर नवीन सहा अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलशी जोडण्यात आले आहेत. जेणेकरुन पुढील उपचारही अत्यल्प दरात, मोफत होतील. त्याचबरोबर आजारी रजा, मॅटर्नीटी रजा, अपघात उपचार अशा अनेक सुविधा या अंतर्गत मिळणार आहेत. केंद्राच्या या सुविधा कामगारांच्या घरापर्यंत कशा पोहचतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत.
यावेळी मुंडे म्हणाले, केंद्र सरकारची हि योजना दुर्लक्षीत होती. खासदार संजय मंडलीक साहेबांनी त्याच्यावर प्रकाश टाकून पुढाकार घेतला आहे. यड्रावकर साहेबांच्या आग्रही भूमिकेमुळे व खासदार धैर्यशील माने यांच्यामुळे सहकार्यामुळे राज्यातील पहिले चार आरोग्य केंद्रे कोल्हापूर जिल्ह्यात उभारत आहेत. याच धर्तीवर आता राज्यात १०० नवीन आरोग्य केंद्रे उभारत आहेत. त्याचबरोबर स्टेट कार्पोरेशनचे आप्पासाहेब धुळाज, ए.एम.ओ.चे डॉ. श्रीपाद भागवत यांचे सहकार्य मिळत आहे. मंत्री यड्रावकर साहेबांनी अत्यल्प वेळेत सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या.
यावेळी कामगार नेते शामराव कुलकर्णी, तुषार सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. पार्वती औद्योगिक वसाहतमधील या सेवा दवाखान्यात डॉ.यश पाटील व डॉ. श्रद्धा परब यांचे मार्गदर्शनाखाली १२ कर्मचारी स्टाफ उपलब्ध आहे याठिकाणी १५००० राज्य कामगार विमा योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सत्तर ते एैशी हजार जना या दवाखान्या मुळे लाभ होणार आहे. त्यामुळे कामगारांना घराजवळ सेवा उपलब्ध होणार आहे.