प्रतिनिधी / इचलकरंजी
यड्राव (ता. शिरोळ ) येथील बेघर वसाहतीमधील पाण्याच्या टाकीनजीक किराणा व्यापाऱ्यावर दोघा युवकानी चाकूने भोसकून खून केला. प्रशांत भिकाजी भोसले ( वय ३६, रा. बेघर वसाहत, यड्राव, ता. शिरोळ) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. खूनाची घटना शुक्रवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी या खून प्रकरणी मुख्य संशयीत आरोपीसह दोघांना शनिवारी पहाटे अटक केली आहे.
मुख्य संशयीत आरोपी पिंटू उर्फ अमित बाबू आदमाने ( वय ४०), त्याचा साथीदार राहुल पोवार ( वय २५, रा. बेघर वसाहत, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. या खूनाच्या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.
पोलिसाच्याकडून समजलेली माहिती अशी, मृत किराणा व्यापारी प्रशांत भोसले आणि मुख्य संशयीत आरोपी पिंटू उर्फ अमित आदमाने हे दोघे मित्र होते. या दोघाच्यामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी अनैतिक संबंधातून मोठा वाद होवून वैमस्य निर्माण झाले होते. याच जुन्या वादातून
किराणा व्यापारी भोसले यांच्यावर शुक्रवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चाकूने खूनी हल्ला करीत भोसकले. छातीवर झालेला चाकूचा वार वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच त्याचे नातेवाईक आणि मित्रानी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी इचलकरंजी मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला.
यावेळी हॉस्पिटलच्या आवारात मृत प्रशांत भोसलेच्या घरच्यासह मित्र मंडळीनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी, शहापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी भेट दिली. खूनाच्या घटनेनंतर यड्रावमधील बेघर वसाहतीमध्ये अनुचित प्रकार घडू नये, या करता पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.