वार्ताहर / यड्राव
इचलकरंजी – जयसिंगपूर रोडवर सकाळी मानसिंग दिनकर खोत वय ५०, रा. खोतवाडी, ता.हातकणंगले यांना भंडारे पेट्रोलपंपानजीक पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अज्ञात वाहनचालकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार गजानन विलास नलगे (रा. खोतवाडी) यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मानसिंग खोत हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी खोतवाडीतून निघाले होते. संगमनगर ते कोंडीग्रे फाटा या मार्गावर भंडारे पेट्रोलपंपानजीक आले असता एका भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये ते जागीच ठार झाले.
परंतु वाहन चालकाने गाडी न थांबविता इथून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच खोतवाडी मधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अज्ञात वाहन चालकाच्या शोधासाठी शहापूर पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेत आहेत.