ताराराणी आघाडीचे माजी गटनेते सत्यजित कदम यांचा सवाल : महापालिका प्रशासकांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील सहाहजार शून्य मिळकत असणाऱ्या मिळकती आणि मिळकतधारकांची यादी मिळावी. तसेच या मिळकती केव्हा पासून अवैध अर्थात इनव्हॅलीड करण्यात आल्या आहेत आणि त्याला जबाबदार कोण आहे ? याचीही माहिती देण्यात यावी, अशी मागणी ताराराणी आघाडीचे माजी गटनेते सत्यजित कदम यांच्यासह भाजपचे माजी गटनेते तथा विरोधीपक्ष नेते विजय सूर्यवंशी आणि माजी महापौर सुनील कदम यांनी एका पत्रकाव्दारे महापालिका प्रशासकांकडे केली आहे.
पत्रकात घरफाळा विभागाच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले असून त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे. शून्य आकारणी असलेल्या सहाहजार मिळकतधारकांची यादी देण्यात यावी. या मिळकती कधीपासून अवैध ठरविण्यात आल्या, या प्रकाराला कोण जबाबदार आहे ही बाबही स्पष्ट करण्यात यावी. अवैध ठरविलेल्या या मिळकतींना घरफाळ्याची नवीन बिले केव्हापासून देण्यात येणार आहेत?, सुधारीत बिलानुसार रक्कम किती होते?, 254 कोटी थकीत घरफाळ्यांपैकी बड्या मिळकतधारकांची यादी मिळावी, या वसुलीसाठी घरफाळा विभागाने कोणते नियोजन केले आहे? या संदर्भात खुलासा करण्यात यावा, असेही पत्रकात म्हटले आहे.
चर्चेसाठी तारीख व वेळ द्या
घरफाळ्या संदर्भातील प्रश्नांसंदर्भात तीन दिवसांत माहिती देण्यात यावी. तसेच माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासोबत प्रशासकांची चर्चा व्हावी, या अनुषंगाने तारीख व वेळ निश्चित करून मिळावी, असेही या पत्रकात सत्यजित कदम यांनी म्हटले आहे.