पुलाची शिरोली/वार्ताहर
टोप ता.हातकणंगले येथील स्टोन क्रशरवर झालेल्या मारामारी प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली. नितीन भोसले ( रा. मिणचे, ता. हातकणंगले ) व सुरज जाधव ( रा. पेठवडगाव ) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत जखमी विजय केशव पोवार ( वय ३०, रा. मादळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी , विजय पोवार रा. मादळे हे श्री भैरवनाथ स्टोन क्रशर येथे पर्यवेक्षक म्हणून काम करतात. शुक्रवार दिनांक १८ रोजी ते वायमेस जाळी आणण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. त्यावेळी नितीन भोसले व सुरज जाधव हे दोघे मोटारसायकलवरून समोरून येत होते. राजनंदीनी स्टोन क्रशर समोर त्यांनी विजय पोवार याला मुद्दाम धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर भोसले व जाधव या दोघांनी पोवार याला मारहाण केली. भोसले याने बेल्टने मारहाण केली. यामध्ये बेल्टचे हुक पोवार याला डोळ्यात लागले. यामुळे पोवार गंभीर जखमी झाला. राजारामपुरी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान राजारामपुरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल होऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी भोसले व जाधव यांना अटक करून न्यायालयात हजर केले.
दगड खणी व स्टोन क्रशर वर वर्चस्व वादातून अनेकदा मजूर व कर्मचारी यांच्यात वादावादी व मारामारी होत असते. पण सध्या गुंड पोसण्यापर्यंत वर्चस्ववाद वाढला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास राजकीय हितसंबंधातून खण आणि क्रशर उद्योगातून माफिया राज्य सुरू होईल असे खण व क्रशर व्यावसायिकांतून बोलले जात आहे.